ताज्या घडामोडी

कारुण्यसिंधू भव दुःख हारी तुजविण शंभो मज कोण तारी…..

“नमामि शमीशां निर्वाण रुपं….
 विभम व्यापकम ब्रम्हवेद: स्वरूपं
निज निर्गुणम निर्विकल्पम निरीहं….
 चिदाकाशमाकाश वासं भजेहम….”
संस्कृत मधील या सुंदर श्लोकात श्री. शिवाचे वर्णन असे केले आहे की, सर्व शक्तीमान आकाश ह्या तत्त्वाप्रमाणे सर्व व्यापक ज्यात संपूर्ण ज्ञान समाविष्ट आहे, जे अनादी आहे अशी ही एक ध्यानावस्था आहे.जेथे चेतनेच्या आकाश तत्वाशिवाय काहीही नाही.
या स्पष्टीकरणातून विविध नामांनी अशा विशेषणांनी आपण ज्याला संबोधतो त्या श्री. उमापती, भोलेनाथ, नीलकंठ, गौरीहर, दीनानाथ, शुलपाणी,सांब सदाशिव, उमेश, महेश आणि वैदिक ग्रंथानुसार रुद्र अर्थात तेच’ महादेव’आहेत. ज्यांना आपण आपल्या मंदिर रूपी आतम्यात साठवून ठेवले आहे.
‘शिव’ शब्दाचा वर्णविग्रह केला तर शि ‘म्हणजे ‘श ‘आणि ‘इ’ याचा समन्वय’ श ‘म्हणजे शरीर आणि’ ई’ म्हणजे ईश्वर तर ‘व ‘म्हणजे  वायु तत्व, गती तत्व होय .या निराकार ,निर्विकार, ई म्हणजे ईश्वर तत्वाला, शिव तत्वाला आपण आपल्यातून वेगळे केले तर ते” शव” या शब्दाची निर्मिती करते जो निष्प्राण आणि निर्जीव ठरतो.
आत्यंतिक शुद्धता, सात्विकता, मांगल्यता यांचे मूर्त स्वरूप असलेले त्याचप्रमाणे वसंत ऋतूतील फुललेल्या कमलदलांपेक्षाही सुकुमार हृदय असलेले, त्रिनेत्र असलेले, नवभुजंगाची आभूषणे ज्याने धारण केली आहे असे, सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या नाशासाठी ज्यांनी त्रिशूल आणि चराचरातील नादब्रम्हाचे प्रतीक असलेला डमरू  हातात धारण केला आहे आणि ज्याच्या जटेतून वाहणारी ज्ञानाची गंगा पृथ्वीतलावर समस्त प्राणीमात्रांच्या आत्मिक शुद्धतेसाठी धावत येताना दिसते अशा त्या स्मशानावासी, चिताभस्म लेपन केलेले, ज्यांच्या सेवेत  ‘नंदी राज’ आहेत असे पूर्ण तत्व,स्थिर तत्व म्हणजे भगवान महादेव होय…
“शं करोती इति शंकर”, जो समस्त जीवांचा उद्धार करतो, कल्याण करतो आणि जो अनादी ,अनंत, पवित्र, सोज्वळ, अथांग, निराकार, पूर्णतत्त्व आहे तो शिव आहे. संपूर्ण ब्रह्मांड सृष्टीचा नायक आणि आकाशतत्व, चेतना तत्व या सगळ्यांना आपल्या सामावून घेण्याचे प्राबल्य ज्याच्यात आहे असा तो भोळा “सांब सदाशिव”म्हणजे भगवान महादेवच होय.
शंभो शंकर हे आदीपुरुष आणि महायोगी आहेत. सृष्टीला समावून घेण्याचे जसे सामर्थ्य त्यांच्यात आहे तसेच सृष्टीचा संहार करण्याचे समर्थ ही त्यांच्यातच आहे.  ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना वेदांनाही जेव्हा मुकेपणा येतो असे ते महादेव आहेत…
वैदिकवाङ्मय ,पुराणे,रामायण, महाभारत ,शिवतांडव स्तोत्र, शिवलीलामृत आदी ग्रंथांमध्ये आपल्याला या भगवान महादेवांची महती वाचायला मिळते. आणि त्यांचे लोभस ,साधे स्वरूप साधकास आकर्षित करते आणि आपल्या ज्ञात होते की मनुष्यप्राणी तर त्यांना शरण जातातच पण देव, दानव यांना सुद्धा भगवान शंकराविषयी तरणोपाय नाही. त्यांची ‘लिंग’स्वरूपात देखील पूजा करण्यात येते.
भगवान शिव हे चराचरासाठी ऊर्जेचे स्त्रोत आहे नव्हे तर शिव म्हणजेच ऊर्जा चेतना होय आणि शिव म्हणजेच वैराग्य ही..
       वैराग्य हे भगवान शिव शंकरापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम आहेअसे म्हणतात. अध्यात्मात म्हटल्याप्रमाणे ,”तपो योगा गम्य “आदि शंकराचार्य रचित वेदसार शिवस्तोत्रम मधील श्लोकाचा अर्थ असा की, शिवशक्तीला आपण योगसाधना आणि तप यातून  साध्य करून घेऊ शकतो. त्यांची कृपादृष्टी प्राप्त करून घेऊ शकतो.
“ब्रम्हेव गुरुपेणावतिष्ठते ..समस्त जीवांचा उद्धार करण्यासाठी परब्रम्हच गुरु रूप धारण करून अवतीर्ण होतात असे वेदांत केसरी श्री. बाबाजी महाराज पंडित म्हणतात. म्हणून परब्रम्ह आणि श्री गुरु यांच्यात यत्किंचितही भेद नाही.मानवी देहाला मोक्षप्राप्तीपर्यंत नेण्याची शक्ती ह्या गुरूरूपी ईश्वरातच आहे ,म्हणून परमेश्वर आणि श्री गुरु यांचा ध्यास हा जीवाला असावाच असे वाटते.
“कैलास राणा शिव चंद्रमौळी ..
फणिंद्र माथा भ्रगुटी झळाळी .. 
कारूण्य सिंधू दुःखहारी
तुजविण शंभू माझा कोण तारी …
करूणेचा सागर असलेला ,देवांचा देव महादेव यांचा उत्सव करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी महादेवाची पूजा ,आराधना, उपास तपास केले जातात. ठीक ठिकाणी यात्रा असते अतिशय उत्साहात महाशिवरात्री संपूर्ण भारतात  साजरी होते. पुराणांमध्येही या व्रताचे महत्त्व विशद केले आहे.
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच पण त्याच सोबत वैज्ञानिक महत्त्व देखील आहे.प्रत्येक महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी मार्च या महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्री अत्यंत महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो म्हणून हा उत्सव रात्रभर साजरा केला जातो.
सर्व व्यापक असे हे सर्वांग सुंदर, वात्सल्यमय, चिरंतन सत्व भगवान महादेव समस्त जीवांचे रक्षण आणि उद्धार करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .
सौ. पूर्वा निखिल पुराणिक
सरकार नगर चंद्रपूर.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये