ताज्या घडामोडी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर नव्यानेच रुजु झालेले मुमक्का सुदर्शन ह्यांनी पोलीस विभागाला अलर्ट मोड वर आणले असुन जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जणु पोलीस विभागात चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत असुन पोलीस विभागाला अचानक अवैध धंदे करणारे सापडू लागले आहेत. जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीविरुद्ध कारवाया सुरू झाल्या, जिल्ह्यातील अवैध सुगंधी तंबाखू व पानमसाला विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे मात्र अजुनही ह्यातील मोठे मासे राजरोसपणे मोकाट फिरत असुन पोलिसांना धेंडांची माहिती नाही असे नाही मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला अनुसरून कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याने लहान सहान तंबाखू विक्रेत्यांना अडकवून काही लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे मात्र कोट्यवधींचे व्यवहार करणारे चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती येथिल मोठे मासे मोकाट फिरत आहेत. इतकेच नाही तर काही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्ड वर फरार आहेत मात्र ते आपला व्यवसाय अजुनही त्याच जोमाने त्याच जागेवर राजरोसपणे करत असल्याची चर्चा आहे.

अवैध रेती, सुगंधी तंबाखू एव्हढ्यावरच सध्यातरी पोलीस कारवाई थांबलेली आहे मात्र जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका, सट्टा, कोळसा तस्करी, गोवंश तस्करी घरफोडी, दुचाकी चोरी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सिंचनासाठी बसवलेल्या पाण्याच्या मोटारी व शेती उपयोगी साहित्य तसेच अवजारांचा चोरीचे प्रमाण वाढले असुन मोठ्या तसेच भुरट्या चोरांवर वचक बसविण्यात जिल्हा पोलिस दल अजुनही अपयशी ठरले असल्याचे चित्र आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी फर्मान काढल्यामुळे कारवाया सुरू असल्यतरी आगामी काही दिवसांत पुन्हा अवैध तंबाखु विक्री पूर्ववत सुरू होण्याचा विश्वास ह्या तस्करांना असुन नवे अधिकारी आले की काही दिवस कारवाईचे नाटक असते त्यानंतर मात्र पुन्हा सुगीचे दिवस येतात असे त्यांचे म्हणणे असुन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक ह्याला अपवाद ठरतात का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तुर्तास सुरू असलेल्या कारवाई मुळे सामान्य जनता समाधान व्यक्त करत असली तरीही मागचे पाढे पंचावन्न ह्या उक्तीप्रमाणे अवैध धंदे पुन्हा त्याच जोमाने सुरू होतील अशी धास्ती देखिल नागरिकांना असुन पोलीस अधिक्षक जनतेचा विश्वास कितपत जिंकतात ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ह्यापूर्वी जिल्ह्याला रहमान नावाचे पोलीस अधीक्षक लाभले होते त्यांची त्यावेळची जिल्ह्यातील कामगिरी व त्यांनी गुन्हेगारांवर बसवलेला वचक अजुनही लोकांच्या चांगलाच लक्षात असुन नवे पोलीस अधीक्षक देखिल जिल्ह्यातील नागरिकांच्या स्मरणात आपले स्थान कायमचे कोरतील अशी आशा व शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये