ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगरच्या डॉ. सुधा कांकरिया यांचे मानवतेच्या कार्यासाठी नोबेल पीस अवॉर्ड ह्या सर्वोच्च जागतिक सन्मानासाठी नामांकन

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेल ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. शांततेसाठी देण्यात येणार्‍या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अशा चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

 यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांचे नांव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे व नोबेल कमिटीने हे स्विकारलेले असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन िवश्व शांतीदूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. सुधीर तारे यांनी केले.

डॉ. सुधा कांकरिया गेल्या 40 वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्याबरोबर ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीत झोकुन देऊन कार्य करीत आहेत. 1985 साली देशात पहिल्यांदा स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीची सुरूवात डॉ. सुधाताईंनी केली. जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची सन्मानपुर्वक नोंद झाली. 25 वर्षे बालरंगभुमीची सेवा. गेल्या 12 वर्षा पासून राजयोगा जीवनपध्दतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार करीत असुन कैदी बांधव, अंध बांधवांसाठी तसेच युवा विद्यार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवित आहेत. डॉ. सुधा यांनी 9000 पेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना मोफत हिलिंग सेवा पुरवली.

स्त्रीभ्रुणहत्या हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे. कुठल्याही एका उपायाने तो नीट होण्यासारखा नाही. त्यासाठी डॉ. सुधाताईंनी समाजातील स्त्री-पुरूष, लहान-थोर अशा प्रत्येक घटकाला सोबत घेत, कृती कार्यक्रमाद्वारे एक संस्कारपर्व निर्माण केले. आणि त्यामुळे परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. 11 कलमी कृती कार्यक्रमाची उभारणी करून ती भावनीक, मानसिक, सामाजिक, कायदेशीर, सांस्कृतिक, आध्यात्मिक सुत्रांमध्ये गुंफली. आणि कृतीशीलरित्या राबविली. डॉ. सुधाताईंनी 11 कलमी कृती कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातुन अनेक वेळा कार्यशाळा घेतल्या. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांना सोबत घेत. युवापिढीमध्ये सजगता निर्माण केली. एन एस एस व एन सी सी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. सुमारे 1200 नकोशी सारख्या नकारात्मक मुलींचे नामकरण करून त्यांचे भविष्य घडविले. टाईम्स ऑफ इंडिया ने त्याचा अभ्यास करून मुलींच्या जीवनात सकारात्मक झालेला बदल जगभर प्रकाशित केला. आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा हा नवीन महत्वपूर्ण पायंडा डॉ. सुधाताईंनी घालून दिला. 11 हजारपेक्षा जास्त वधुवरांनी घेतला आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा. डॉ. सुधाताईंच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीजन्माच्या स्वागताचे हजारो ठराव पारित झाले. सामुहिक शपथच्या माध्यमातुन 30 लाख व्यक्तींना त्यांनी सामावुन घेतले.

मुला मुलींच्या संख्येत तफावत असेल तर सामाजिक असमतोल निर्माण होतो. त्यातुन स्त्रियांचे जीवन असुरक्षित होते. समाजमन पोखरले जाते. स्त्रियांवरील अत्याचार वाढतात. अशांतता व अस्थिरता वाढत जाते. डॉ. सुधाताईंनी सतत अखंडपणे 40 वर्षे स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीमध्ये झोकुन देऊन कार्य केले. या चळवळीची निर्मिती, त्यातील नाविण्य, सातत्य, कृतीतुन परिवर्तन करण्याचा चंग बांधला. त्यासाठी अवघे जीवन समर्पित केले. या सर्व कार्यात कोणाकडूनही 1 रू ची ही मदत न घेता पदरमोड करून 40 वर्षे चळवळ गतीमान केली.

डॉ. सुधा कांकरिया या समाजसेवेचा महायज्ञ असून तीन तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणार्‍या स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक, एक अष्टपैलू व्यक्तीमत्व तसेच सामाजिक शांती प्रस्थापनेसाठी पुढाकार घेणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दोन राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या या कार्याचे कौतुक झाले. 2007 साली अब्दुल कलाम यांच्या वतीने ‘निर्मलग्राम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. युरोप येथील युनिर्वसिटी ऑफमाऊंटन्सच्या वतीने डॉ. सुधाताईंना ‘वुमन एक्सलन्स अवॉर्डने’ सन्मानित करण्यात आले. रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांच्या रिप्रेझेंटेटीव्ह Virpi Honkala यांच्या हस्ते रोटरी कम्यॅुनिटी बिल्डर अवॉर्ड प्रदान तसेच रोटरी आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेमध्ये रोटरी फाऊंडेशनचे पदाधिकारी एन सुबामिनन यांच्या हस्ते विशेष गौरव झाला आणि इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय प्रेसेडेंशियल अवॉर्ड आणि शब्दशारदा पुरस्कार प्रदान. डीडी सहयाद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्काराच्या व झी मराठीचा उंच माझा झोका पुरस्काराच्या डॉ. सुधाताई मानकरी ठरल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदि 150 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. सुधाताईंच्या समाजसेवेच्या उत्तुंग भरारीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावरही उमटले. ’डॉ. सुधा कांकरिया’ नांवाचे पोस्टाचे तिकीटही प्रसिध्द झाले ही किती गौरवाची बाब आहे. महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे डॉ. सुधाताईंना ‘नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाईल्ड मिशन इन इंडिया’ हा सन्मान प्राप्त झाला आहे.

सदर प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, महाराष्ट्र ऑफ्थ्लमिक सोसायटी चे माजी अध्यक्ष मधुसुदन झंवर व अ.भा. जैन महिला संघटनेच्या माजी अध्यक्ष सौ विमल बाफना जितो संघटनेचे चेतन भंडारी, वालचंदजी, अजय मेहेता, दिनेश ओसवाल, दिलीप जैन, किशोर ओसवाल, पारसजी मोदी (पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष जैन कॉन्फरन्स मुंबई), रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर, डॉ. राणी दुष्यंत खेडीकर अध्यक्ष बाल कल्याण समिती पुणे, बीके त्रिवेणी दिदी, स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील मंदाताई नाईक यांनी डॉ. सुधा कांकरिया यांचा नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन झाल्याबद्दल सन्मान केला. सदर कार्यक्रमात डॉ. प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केले. डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये