विवेकानंद विद्यालयात निरोप समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती : स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा समारंभ दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पार पडला. हा समारंभ इयत्ता 9 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांद्वारे आयोजित करण्यात आला होता.
समारंभाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय लांबट होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक बळवंत पावडे, इ. 10 वी चे वर्गशिक्षक दयाकर मग्गीडवार आणि ज्येष्ठ शिक्षिका कल्पना ठावरी मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलित करण्यात येऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. यांमध्ये वेदांत मार्कंड, वैष्णवी भोई, पूनम खंडाळकर, प्रज्वल कुळमेथे आदि विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातुन विद्यालयाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास एक स्टँड फॅन भेट स्वरूपात देण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दयाकर मग्गीडवार, बळवंत पावडे व कल्पना ठावरी यांनी परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य कसं जपलं पाहिजे यांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक विजय लांबट यांनी एकलव्य व द्रोणाचार्य यांच्या कथेद्वारे गुरू शिष्य परंपरा, गुरु व गुरुदक्षिणा यांचे महत्त्व यांवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी शाहीन पठाण व आभार प्रदर्शन इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी आस्था बारतीने यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशा मते, तुकाराम पोफळे, संजय आगलावे, पुरुषोत्तम श्रीरामे आदि शिक्षक वृंद आणि विनोद गावंडे, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे, रामदास ठक आदि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इयत्ता 9 वी व 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.