अखेर घरकुल लाभार्थ्यांना रेतीसाठी रॉयल्टीचे वाटप
सावली काँग्रेसच्या उपोषणाची दखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी डॉ. शेखर प्यारमवार
घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत देण्याचा शासकीय परिपत्रक असतांना सावली तालुका प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याने सावली तालुका काँग्रेसच्या वतीने २१ मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. उपोषणाची दखल घेत तहसील प्रशासनाने रेती वाहतूक परवाने वाटप केल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.
तालुक्यात प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण आवास, रमाई आवास योजनेनंतर्गत हजारो घरकुल मिळाले, पण रेतीचे काय असा प्रश्न अनेक घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. रेतीच्या टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही तर काहींनी अधिकच्या भावाने चोरीची रेती खरेदी करून बांधकाम सुरु केले मात्र तेही अर्धवट आहेत. घरकूल लाभार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने अनेकदा प्रशासन दरबारी रेतीची मागणी केली जात होती. मात्र अनेक अटी लावत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने व पावसाळा सुरु होणार असल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह २१ मे रोजी उपोषणाला सुरवात करण्यात आली. घरकुल धारकांना मोफत वाळूचा पुरवठा करण्यात यावा ही मुख्य मागणी होती. प्रशासनाने उपोषणाची दखल घरकुलधारकांना रेती वाहतुकीचे परवाने वाटप केल्याने उपोषणाची सांगता पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लूरवार यांचे हस्ते उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन करण्यात आली.
यावेळी माजी जि.प.सदस्य पांडुरंग तांगडे,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर दिनेश पाटील चिटणुरवार,तालुका अध्यक्ष नितीन गोहने, माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा सचिव यशवंत बोरकुटे शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी नगराध्यक्षा लता लाकडे,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,माजी युवा तालुका अध्यक्ष आशिष मंबतुलवार,विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार,बोथलीचे सरपंच सुशील नरेड्डीवार,उपसरपंच विजय गड्डमवार,कृषी उ.बा.स.संचालक सुनील बोमणवार,संचालक अरविंद भैसारे,संचालक केशव भरडकर,संचालिका कांताबाई बोरकुटे,ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळाचे अध्यक्ष अनिल मशाखेत्री,लोंढोली ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष दिलिप लटारे,उसेगाव ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष सुनील पाल,रुद्रापूर ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष खुशाल राऊत,नगरसेवक प्रितम गेडाम,सचिन संगीडवार,नितेश रस्से,नगरसेविका साधना वाढई,हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाके,हरांबाचे उपसरपंच प्रवीण संतोषवार,जेष्ठ पदाधिकारी दिवाकर काचीनवार उत्तम जुमनाके, किशोर घोटेकर,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावली तहसीलदारांची उपोषण मंडपात मग्रुरीची भाषा
एखाद्या कार्यालयासमोर उपोषण सुरु असल्यास ते कसं समोपचाराने सोडविता येईल यासाठी प्रशासनाची धडपड असते. मात्र सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे या आंदोलक, उपोषणकर्ते यांना महत्व न देता मग्रुरीने वागत असल्याचे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. उपोषण सुरु असतांना मध्यस्थीने आग्रह केल्यानंतर उपोषण स्थळी पाणी घेऊन आले. मात्र उपोषणकर्त्यांनी चर्चा केल्यानंतर उपोषण सोडण्याचा विचार करू असा आग्रह धरला.
मात्र मी इथे चर्चा करायला आली नाही उपोषण सोडवायलाच आली असे बोलत निघून गेल्या. त्यानंतर कार्यकर्ते चर्चा करायला तहसीलदारच्या केबिनमध्ये गेले व चर्चा झाली मात्र उपोषण सोडवायला तहसीलदार आल्याच नसल्याने तहसीलदारांच्या मग्रुरीचा अनुभव उपस्थितांना आला.