ताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कालवश – वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान - कोहिनुर झाले पोरके

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री, माजी लोकसभा सभापती व प्रसिध्द कोहीनुर क्लासेसचे संस्थापक, हाडाचे शिक्षक, खुद्द बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या तालमीत तयार झालेले कडवे शिवसैनिक मनोहर जोशी ह्यांचे आज पहाटे 3:00 वाजताच्या सुमारास हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही पहाटे 3:00 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असे रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे.

मूळ बीड जिल्ह्यातील असलेले मनोहर जोशी ह्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात 2 डिसेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले. शिक्षण पुर्ण करुन ते मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांना ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकर मिळाली. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले. मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. त्यातील यशानंतर मनोहर जोशी ह्यांनी कोहिनूर क्लासेस (दादर-मुंबई), मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई), कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (मुंबईत अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्‍नागिरी, सांगली वगैरे एकूण ४० ठिकाणी), कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), इत्यादी शिक्षण संस्था उभारल्या.

पुढे हिंदु ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा शिवसेनेकडे ओढा वाढला व ते शिवसेनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. बाळासाहेबांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास असल्याने त्यांना महापालिका, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा इत्यादी सभागृहात जाण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे आपल्या कर्तुत्वाने व कार्यशैलीने सोने करून प्रत्येकठिकाणी त्यांनी आपली छाप सोडली.

महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीचे शासन येताच बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी दिली. १४ मार्च, १९९५ ते ३१ जानेवारी, १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनतर नारायण राणे यांचेकडे मुख्यमंत्री पद सोपविण्यात आले. मनोहर जोशी १९९९ ते २००२ या काळात अटल बिहारी वाजपेयी सरकार मधे केंद्रीयमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. पुढे ते लोकसभेचे तत्कालीन सभापती जी एम सी बालयोगी ह्यांचे निधन झाल्याने २००२ ते २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये