ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मनपाची ‘शिका आणि कमवा’ योजना 

नुकतेच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मनपात काम करून पदवीधर होण्याची संधी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नुकतेच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिका आणि कमवा’ योजना राबविण्यात येणार असुन या योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या,चंद्रपूर महानगरपालिकेच्या शहरी भागातील, निवडक गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना सन 2025-26 या वर्षापासून महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये, तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ (Digital and AI Facilitator) म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे.

    IGNOU च्या BBA (SM) या कार्यानुभवावर आधारित दूरस्थ पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना ३ वर्षे एखाद्या कार्यालयामध्ये पूर्णवेळ इंटर्नशिप करणे बंधनकारक असते. ही 3 वर्षाची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘शिका आणि कमवा’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वर्षापासून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविली जाणार आहे.

    सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. 5 हजार दुसऱ्या वर्षी रु. 6 हजार आणि शेवटच्या वर्षासाठी रु. 7 हजार इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.

    सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration (Services Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे महापालिकेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच 12 वी नंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्यावर आधारीत शिक्षण हे स्वत:च्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.

    चंद्रपूर महानगपालिकेच्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच चंद्रपूर च्या शहरी भागातील 18 ते 25 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्यागुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी केले आहे.

    सदर योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 2 जून 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/cmcibba2025ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच मनपाच्या संगणक विभागात संपर्क साधता येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये