ताज्या घडामोडी

दोन वर्षाच्या चिमुकल्यासाठी डाॅ. मनीष मुंधडा ठरले देवदूत

गळ्यात अडकलेली 'हेअर पीन' लिलया काढली

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- घरातील बेडवर दोन भावंडं खेळत असताना अचानक केसाला लावण्याची पीन दोन वर्षाच्या चिमुकल्याने तोंडात टाकली. आईला चावण्याचा आवाज येताच त्याच्याकडे पोहोचण्यापूर्वी पीन घशात जावून फसली. या प्रकाराने घाबरलेल्या अवस्थेत आई-वडीलांनी गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे उपचाराची सोय नसल्याने चंद्रपूरच्या भारती हाॅस्पीटलमध्ये ३ जानेवारीला मध्यरात्री आणल्यानंतर डाॅ. मनीष मुंधडा यांनी यशस्वी प्रयत्न करुन गळ्यात अडकलेली हेअर पीन लिलया काढली व बालकाला नवे जीवन दिले.

संकेत युवराज गेडाम रा. व्याहाड (बुज.)असे बालकाचे नाव असून, आता त्याची प्रकृती ठणठणीत आहे. सावली तालुक्यातील व्याहाड (बुज.) येथील युवराज गेडाम यांची दोन्ही मुले बुधवारी रात्री घरी खेळत असताना दोन वर्षाच्या संकेतने नजर चुकवून पीन तोंडात टाकली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर आईने त्याच्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत पीन घशात फसली होती. चिमुकला पीन गळ्यात गेल्याने कासावीस होत असताना आई-वडील व काही नागरिकांनी तात्काळ गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात भरती केले.

परंतु त्या ठिकाणी उपचार शक्य नसल्याने चंद्रपूरला रेफर करण्यात आले. चंद्रपूरच्या रुग्णालयात मशीनअभावी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. त्या कालावधीत संकेतला श्वास घेणे अवघड जात होते. दरम्यान, त्याच्या आईने चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात नेवून उपचार करण्याची विनंती केल्यानंतर बुधवारी मध्यरात्री डाॅ. मनीष मुंधडा यांच्या भारती हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. डाॅ. मनीष यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा व कौशल्य पणाला लावून पहाटे ४ वाजताच्या सुमारास यशस्वीपणे पीन बाहेर काढली व संकेतला जीवनदान दिले.

डाॅ. मनीष मुंधडा यांनी यापूर्वी सुद्धा अशाप्रकारच्या कठीण शस्त्रक्रिया करुन अनेकांना जीवनदान दिले. त्यांच्याकडून पुन्हा चिमुकल्या संकेतच्या रुपाने एकाला जीवनदान मिळाल्याने वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान संकेतची प्रकृती चांगली असून त्याच्यावर भारती हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. चिमुकल्या संकेतच्या आई-वडीलांनी डाॅ. मनीष मुंधडा आमच्यासाठी देवदूत ठरल्याची भावना आनंदाश्रू गाळत व्यक्त केली.

भारती हाॅस्पीटलमध्ये डाॅ. मनीष मुंधडा यांनी संकेतवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन नवे जीवन दिले. त्यामुळे डाॅ. मनीष आमच्यासाठी देवासारखे धावून आले. इतर पालकांनी अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी बालकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
– मिना गेडाम (संकेतची आई)
व्याहाड (बुज.)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये