चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रवेश – राजुरा येथे 3 बाधित तर भद्रावती येथिल एकाला संसर्ग
राजुरा येथे 2 महिला व 1 पुरुष बाधित - नागरिकांनी सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
दोन वर्ष जगभर धुमाकुळ घालणारा कोरोना एका दीर्घ विश्रांतीनंतर नव्या अवतारात पुन्हा एकदा परतला असुन महानगरांसह कोरोनाने निमशहरी तसेच ग्रामीण भागातही आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाने पुन्हा एकदा नागरिकांना आपल्या पाशात घेणे सुरू केले असुन जिल्ह्यातील राजुरा शहरात तसेच भद्रावती शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राजुरा येथे 3 जानेवारी रोजी पहिल्या महिला रुग्णाची नोंद झाली तर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी रोजी शहरातील एक महिला व तिचा पती असे दोन रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. भद्रावती येथेही दोन दिवसांपूर्वी एका बाधित व्यक्तीची नोंद झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले असल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकुण संख्या चार वर पोहचली आहे.
राजुरा येथिल तीनही रुग्णांना गृह विलागीकरणात ठेवण्यात आले असुन हे रुग्ण कोरोनाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ह्याचा शोध घेण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला असला तरीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कुठल्याही अफवेला बळी पडू नये, सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, कुठलीही शंका असल्यास कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.