जटपुरा गेट वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे ‘झोपा काढा सत्याग्रह’
हिवाळी अधिवेशन -तिसरा दिवस -तिसरे आंदोलन* *जटपुरा गेट वाहतुकीची कोंडी विरोधात अनोखे आंदोलन

चांदा ब्लास्ट
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरा गेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यानाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी या मागणीला घेऊन सोमवारी इको- प्रोच्या सदस्यांनी ‘झोपा काढा सत्याग्रह’ करीत शासन-प्रशासन व जनप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेमध्ये अरुंद रस्ते आहे. विशेष म्हणजे, जटपुरा गेटपरिसरात वाहतुकीची कोंडी होते. यात वाहनधारकांना प्रदूषणाचाही मारा सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना आजार होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा रुग्णवाहिकाही अडकत असल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येते. अनेकवेळा वाहन समोर जाण्याची कोणतीही शास्वती नसते. अधिक काळ वाहनांची गर्दीमुळे निघणारा धुरामुळे वाहनधारकांचा जीव गुदमरत असतो, त्यामुळे येथील समस्या कायमस्वरुपी सोडवावी, अशी मागणी करीत इको- प्रोच्या सदस्यांनी गांधीगिरी करीत आज “झोपा काढा सत्याग्रह” केले. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांचे माध्यमाने विधान मंडळ अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री यांना तर पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदने देण्यात येणार आहे.
जटपूरा गेटवर इको-प्रोच्या सदस्यांनी यापूर्वी सुद्धा वेगवेगळे आंदोलन केले असून, अनेकदा पाठपुरावा केलेला आहे, यासोबतच अनेक संस्था संघटना यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. अनेक वर्षापासून जटपुरागेटच्या वाहतूक समस्या सोडविण्यास पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी आहे. परंतु आजपर्यंत यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशन निमित्त इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृंघलेमध्ये आज तिसऱ्या दिवशी केलेल्या प्रतिकात्मक “झोपा काढा सत्याग्रह” निमित्ताने येत्या काळात या मागणी करिता तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा इको प्रो तर्फे देण्यात आले आहे.
इको-प्रोच्या वतीने अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सदर सत्याग्रह करण्यात आले या ‘झोपा काढा सत्याग्रह’ मध्ये नितीन रामटेके, अब्दुल जावेद, ओमजी, वर्मा, अनिल अडगुरवार, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, आकाश घोडमारे, सूरज कावळे, भूषण ढवळे, खुशबू जैस्वाल, नेत्रदीपा चिंचोलकर, रोहित तळवेकर आदी उपस्थित होते.



