ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘विशेष स्वच्छता’ अभियान राबवावे – विवेक जॉनसन

22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा

चांदा ब्लास्ट

दिनांक 15/12/2023  केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारी मुक्त अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव स्तरावर वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाची बांधकाम तसेच सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात 30 ऑक्टोबर पासून विशेष स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व गावातून हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे

या विशेष अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधणे शिल्लक आहे, अशा कुंटुबाची यादी तयार करून, त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ द्यावा. सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक शोषखड्डे करण्यावर भर द्यावा. घनकचऱ्यासाठी खतखड्डे (कंपोस्‍ट पीट, नाडेप) तयार करून व्यवस्थापन करावे. तसेच प्‍लास्टिक संकलनासाठी सेग्रीकेशन शेड, कचरा उचलण्‍यासाठी ट्राय सायकल आवश्‍यक आहे. यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील गावांचे नियोजन करून गावे हागणदारी मुक्त करावीत. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावे दत्तक देऊन चाळीस दिवसाच्या अभियानातून गावे शाश्वत स्वच्छ करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी शौचालय बांधकाम तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. सदर बांधकाम योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, संबंधित ग्रामपंचायत, विविध स्तरावरील तांत्रिक अधिकारी, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, तालुका गट समन्वयक व समुह समन्वयक यांनी ग्रामपंचायत भेटी वेळी कामांची पाहणी करावी. तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून सर्व गावांची पडताळणी करावी. गाव स्वच्छतेसाठी 40 दिवसाचे अभियान महत्त्वाच्या असून, सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे

22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा

हागणदारी मुक्त अधिकसाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये येत्या 22 डिसेंबर 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांना मान्यता देणे तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे. दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासंदर्भात चर्चा करणे. दिनांक 1 जानेवारी 2024 नंतर गावात एकही कुटुंब उघडयावर शौचास जाणार नाही याची आवश्यक त्या सर्व उपाय योजना करून ग्रामस्थांना या संदर्भात प्रबोधन करणे. तसेच हागणदारी मुक्त अधिकसाठी लागणारे ठराव, व्हिडिओ चित्रीकरण आदी विषय या विशेष ग्रामसभेत घेण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये