ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र बनले ‘रेफर केंद्र’

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : रुग्णांच्या नातेवाईकमध्ये संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी परिसरातील नागरिक येत असतात. व जिवती येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे अनेक ग्रामस्थांचा येथे राबता असतो. मात्र, बाह्यरुग्ण विभागाशिवाय अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. किरकोळ स्वरूपाच्या रूग्णांनासुद्धा थेट जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुपारच्या सत्रात कधी रुग्ण तपासणीसाठी आला तर, वैद्यकीय अधिकारी येण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रकार येथे पहायला मिळत आहे. अनेक रुग्णांना तर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची ताटकळत वाट पाहावी लागते. अशा स्थितीमुळे अनेकदा वाद निर्माण होतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी आरोग्य केंद्र, नसून “रेफर केंद्र” बनत असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वरिष्ठ अधिकारी मुद्दामच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा

आहे. तालुक्यातील ग्रामिण भागात ऐकीकडे रस्त्यांअभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नसल्याची शोकांतीका तर दुसरीकडे जिवती येथे तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही या आरोग्य केंद्रात योग्य सुविधा नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात गोरगरीब, सामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. हे आरोग्य केंद्र फक्त मलमपट्टी व ताप खोखल्याचे रुग्णांच्या उपचाराचे केंद्र बनले आहे. त्यामुळे इतर रुग्णांना ‘रेफर टू चंद्रपूर’ चे पेपर देवून रुग्ण व नातेवाईकांची बोळवण केली जात असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

आरोग्य केंद्रात नवीन सुविधा उपलब्ध नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने सामान्य कुटुंबातील रुग्णांची उपचारांसाठी हेळसांड होत आहे. या ठिकाणी प्रसूतिसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे; परंतु, प्रसूतिच्या वेळी एखादी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यास सामान्य कुंटुबातील महिला नातेवाईकांना आर्थिक फटका बसतो आहे. काही सुविधा असूनही तज्ज्ञ कर्मचाऱ्यांअभावी नाहक त्रास रुग्णास सोसावा लागत आहे. आरोग्य केंद्रात विविध आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक असून ऐनवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना होत नसल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना सुविधांअभावी चंद्रपूर येथे रेफर करण्याशिवाय पर्यायच रहात नाही. परिणामी गरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आरोग्य केंद्रात मोठया सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे.

◆ प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साहित्याचा नेहमी तुटवडा असतो,सध्या तालुक्यात ताप, सर्दी, खोकला यासह साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डॉक्टर तपासणीनंतर सर्वांना सारखीच औषधी व गोळ्या लिहून देत

असतात.आरोग्य केंद्रात पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत. तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.

– भाग्यश्री मतलाकुटे, नागरिक जिवती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये