महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात अप्रेन्टिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅमवर कार्यशाळा
कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत भारतातील उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेत वाढ करण्यावर अप्रेंटीशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम यावर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने 2025 पासून हे धोरण लागू केले आहे. या कार्यक्रमात पदवी अभ्यासक्रमात प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण समाविष्ट केले जाते. म्हणजेच, विद्यार्थी शिक्षणासोबतच एक ते दोन सेमिस्टर उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतात. यामुळे त्यांचे व्यावसायिक ज्ञान वृद्धिंगत होते आणि करिअरसाठी अधिक सक्षम होतात.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूर येथे अप्रेंटिसिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. या प्रसंगी औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट वर्क चे एच आर आणि माणिकट सिमेंट युनिट हेड श्री.मुकेश गहलोत,अंबुजा सिमेंट कंपनीचे श्री.प्रमोद खडसे,संस्थेचे सचिव धनंजय गोरे,विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे,विद्यापीठाच्या ननावसाचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार, प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, प्राचार्य डॉ.संजय सिंग इत्यादी मान्यवर सहभागी झाले.
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आपली भूमिका व्यक्त करताना अप्रेंटिस डिग्री प्रोग्राम बद्दलचा मुख्य उद्दिष्ट विशद केले ते म्हणाले हा डिग्री प्रोग्राम म्हणजे विद्यार्थ्यांना कामावर आधारित शिक्षण उपलब्ध करून देणे होय त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायोपयोगी कौशल्ये निर्माण होतात.उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यात सशक्त भागीदारी निर्माण होते.शिक्षणातून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ज्ञान मिळते.नोकरीसाठी तयारी आणि आत्मविश्वास निर्माण होतो ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समरसतेने संधी मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून डॉ. मनीष उत्तरवार यांनी अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम बाबतची रुपरेषा, उद्दिष्ट, प्रशिक्षण कालावधी,क्रेडिट फ्रेमवर्क, त्रिपक्षीय करार, मानधन तरतूद, भागधारकांची भूमिका आणि अपेक्षित परिणाम या सर्व घटकांवर त्यांनी प्रकाश टाकला.यावेळी महाविद्यालयाचे डॉ.पटले,डॉ.मुन आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.