ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा संपन्न

विवेक, तर्कशक्ती आणि चिकित्सक वृत्ती जोपासणे गरजेचे : प्रा. पुंडलिक जाधव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     चमत्कारामागील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावती येथे एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. पुंडलिक जाधव, प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, संस्था अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांची उपस्थिती होती.

        भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याचे कर्तव्य दिले कारण विवेक, चिकित्सक विचार आणि पुराव्यावर आधारलेला तर्क नसेल तर समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही घटनात्मक आश्वासने केवळ कोरडी वचने ठरतील. वैज्ञानिक दृष्टीकोन हा केवळ वैचारिक आदर्श नाही, तर लोकशाहीचे प्राणतत्त्व असल्याची माहिती कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी विद्यार्थांशी संवाद साधताना दिली.

           अंधश्रद्धेविरुद्धचा लढा फक्त भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी नसून तो मानवी प्रतिष्ठा, समानता आणि विवेकाधिष्ठित समाजरचनेचा लढा आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अपेक्षेइतका रुजला नाही, अंधश्रद्धा अजूनही सर्व स्तरांवर दिसते अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी दिली.

        प्रा. पुंडलिक जाधव यांनी व्याख्यानातून सविस्तर मार्गदर्शन करत असताना भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाला आश्चर्यचकित करणारी प्रगती केली आहे. पोलिओ निर्मूलन, कोविड-१९ लसीकरण मोहीम यांसारख्या आरोग्य मोहिमांत विज्ञानाधारित धोरणांनी यश मिळवले. सरकारने अनेक वेळा पुराव्यावर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित निर्णय घेतले. “समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अपेक्षेइतका रुजला नाही अंधश्रद्धा अजूनही सर्व स्तरांवर दिसते.

काही राजकीय भाषणांत पुराणकथा विज्ञानावर वरचढ दाखवल्या जातात. चुकीची माहिती, चमत्कारिक उपचार, कटकारस्थानांच्या अफवा, अंधश्रद्धाळू मेसेज सोशल मीडियामुळे सहज पसरतात. घटनात्मक तत्त्वांचा आधार घेऊन विवेक, तर्कशक्ती आणि चिकित्सक वृत्ती जोपासणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शन यावेळी करून काही प्रात्यक्षिक करून दाखविले.

कार्यक्रमाची प्रास्ताविका प्राचार्य सुधीर मोते, यांनी केली असून आभार प्रदर्शनातून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत पाठक, प्रा. कपिल राऊत, प्रा . विशाल प्रसाद, प्रा. प्रज्ञा लांडे, प्रा. प्रीती कनकट्टीवार, प्रा. नेहा मानकर, यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये