ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आपसी सहमतीने शेतरस्ते मोकळे करण्याचा आदर्श उपक्रम

तहसील कार्यालय, पोंभुर्णा यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीच्या वहिवाटीसाठी असलेले पारंपरिक पांदण व शेतरस्ते गैरसमज, सीमावाद किंवा संवादाच्या अभावामुळे अडवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतरस्ते अडवल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतीकाम, पीक वाहतूक, दैनंदिन व्यवहार तसेच आपत्कालीन सेवांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असून, याचा थेट परिणाम गावातील सामाजिक स्वास्थ्य, परस्पर विश्वास व एकोप्यावर होत आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 143 तसेच मामलेदार कोर्ट अ‍ॅक्ट, 1906 अन्वये अडवलेला शेतरस्ता मोकळा करून देण्याचा किंवा आवश्यकतेनुसार नवीन रस्ता देण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. मात्र, असे प्रकरण तहसीलदार न्यायालयात दाखल झाल्यानंतर कायदेशीर कार्यवाही सुरू होत असल्याने संबंधित पक्षांमधील वाद अधिक तीव्र होण्याची तसेच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर मौजे चक हत्तीबोडी येथे मंडळ अधिकारी चिडे व ग्राम महसूल अधिकारी श्रीमती आरती धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमित पांदण रस्ता शेतकऱ्यांनी आपसी संवाद व परस्पर सहमतीतून मोकळा करून दिल्याचा आदर्श उपक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला. कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ग्रामस्थांनी परस्पर विश्वास ठेवून सामंजस्याने निर्णय घेतल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला असून, गावातील सामाजिक सलोखा व एकोपा अधिक दृढ झाला आहे. हा उपक्रम तालुक्यातील इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

गावातील शांतता, सामाजिक सलोखा व परस्पर सहकार्य अबाधित राखण्यासाठी शेतरस्त्यांचे प्रश्न प्रथम आपसी समजुतीने व सहमतीने सोडविणे हे सर्वांच्या हिताचे आहे. पारंपरिक वहिवाटीचे रस्ते मोकळे ठेवणे व शेजारी शेतकऱ्यांच्या गरजांची जाणीव ठेवून परस्पर सहकार्य करणे हीच ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख आहे.

तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात येते की, शेतरस्त्यांबाबत कोणताही वाद उद्भवल्यास प्रथम ग्रामपातळीवर चर्चा, संवाद व सामंजस्याच्या माध्यमातून तोडगा काढावा. आपसी सहमतीने रस्ते मोकळे केल्यास तहसील कार्यालयामार्फत न्यायालयीन कार्यवाही करण्याची गरज भासणार नाही तसेच अनावश्यक वाद, वेळ व खर्च टाळता येईल.

सामाजिक तणाव निर्माण होण्यापेक्षा गावाचा विकास, शेतकऱ्यांचे हित व परस्पर विश्वास यांना प्राधान्य देत एकोप्याने शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन तहसील कार्यालय, पोंभुर्णा यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये