पालकमंत्र्यांनी दिला व्हॉलीबॉल खेळाडूंना दिलासा – सुरज ठाकरे ह्यांच्या प्रयत्नांनी खेळला मिळतेय प्रोत्साहन
खेळाडूंनी मानले पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार व सुरज ठाकरेंचे आभार
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
शहरी तसेच ग्रामीण भागात दर्जेदार खेळाडू असुनही त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने क्षमता असूनही देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करता येत नसल्याचे चित्र स्पष्ट असुनही शासन प्रशासनची खेळाडूंप्रती असलेली उदासीन भावना क्रीडापटूंना अडचणीची ठरत असल्याचे चित्र राजुरा तालुक्यातही बघायला मिळत आहे.
राजुरा शहरात मागील काही वर्षांपासून केसरीनंदन क्रीडा मंडळ व्हॉलीबॉल शासकीय उदासिनतेला दुर्लक्षून व्हॉलीबॉल क्रीडा प्रकार जनसामान्यात रुजवत आहे. मंडळाची स्थापना शहरातील सामान्य युवकांनी केली असुन शहरातून असामान्य खेळाडू घडविण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते मात्र खेळाडूंना सरावासाठी स्थायी मैदान नसल्याने खेळाडूंची फरफट होत असल्याचे दृष्य आहे. ज्या ठिकाणी मोकळे मैदान मिळेल त्या ठिकाणी काही काळ सराव करायचा त्यानंतर दुसऱ्या जागेचा शोध घेऊन तिथे स्थलांतरित व्हायचे असा प्रकार ह्या क्रीडा मंडळाला करावा लागतो.
ह्यापूर्वी सराव सुरू असलेल्या जागी बांधकाम झाल्याने ते मैदान सोडून खेळाडू जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सराव करू लागले. मात्र ह्या मैदानावर विद्युत दिव्यांची सुविधा नसल्याने खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेरीस केसरीनंदन क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी आम आदमी पक्षाचे धडाडीचे नेतृत्व सुरज ठाकरे ह्यांची भेट घेऊन आपले कैफियत मांडली.
खेळाडूंची अडचण लक्षात घेऊन सुरज ठाकरे ह्यांनी मंडळाचे सदस्य व खेळाडूंची पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांचे कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व शाळेच्या मैदानावर विद्युत दिव्यांची सुविधा देण्याची मागणी केली. पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांनीदेखील खेळाडूंच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला खेळाडूंना सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. सुरज ठाकरे ह्यांच्या धडाडीने व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या कार्यक्षमतेने खेळाडूंना तत्काळ दिलासा मिळाल्यामुळे मंडळाचे सर्व पदाधिकारी व खेळाडूंनी दोन्ही नेत्यांचे मनस्वी आभार मानले आहे.