ग्रामीण रूग्णालयातील पद निर्मिती करून रुग्णालय सुरू करा
आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्राकडे निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- राजुरा विधानसभा मतदार संघातील जिवती तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल तालुका असुन जिल्ह्याचे ठिकाणापासुन १०० किमी अंतरावर आहे. तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिवती येथे तालुक्याचे ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयास १७ जानेवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालय जिवती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.
त्यानुसार जिवती तालुक्याचे ठिकाणी ग्रामीण रूग्णालय इमारतीचे १०० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून रुग्णालय सुरू करणेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करूण देण्याकरिता पद निर्मिती करणेबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये राज्य स्तर मुंबई यांचे कार्यालयाकडुन पदनिमिर्ती बाबतचा प्रस्ताव प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग (आरोग्य ३) मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाकडे २ मे २०२३ ला प्रस्ताव फेर सादर करण्यात आलेला आहे.
करीता चंद्रपूर जिल्हयातील राजूरा मतदार संघातील ग्रामीण रूग्णालय जिवती येथे आकृतीबंधानुसार पद निर्मितीस मंजुरी देऊन ग्रामीण रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे. आमदार सुभाष धोटे यांनी याबाबत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात तसेच अनेकदा निवेदनाद्वारे शासनाकडे पाठपुरावा करून जिवती सारख्या दुर्गम भागात उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.