वृक्षारोपणाची संकल्पना समाजात रूजवली गेली पाहीजे – मुरलीधर बेलखोडे
पारस-सोनल या नवदाम्पत्याने वृक्षारोपणाने वैवाहिक जीवनाचा केला शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘आपल्या सर्वांच्या जीवनचक्रात वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्म झाल्याबरोबर लाकडी पाळणा, बालपणी लाकडी खेळणी, प्रत्येक सणात वृक्षांचा सबंध, विवाहाच्या सर्व सोहळ्यात लाकूड व वृक्षाचे अस्तित्व, म्हातारपणी लाकडी काठी तर मृत्यूनंतर अग्निसंस्कार लाकडाशिवाय अपुर्ण आहे. म्हणूनच प्रत्येकाने वृक्षारोपण श वृक्षसंवर्धन आपली जबाबदारी समजली पाहीजे. या दृष्टिकोनातून पारस चांभारे व सोनल चांभारे-गुजरकर यांनी विवाह वृक्षरोप लावून समाजाला सकारात्मक संदेश दिलेला असून विवाह वृक्षारोपणाची संकल्पना समाजात रूजवली गेली पाहीजे, असे प्रतिपादन स्थानिक निसर्ग सेवा समितीच्या ‘ऑक्सिजन पार्क’ परीसरात संपन्न झालेल्या ‘विवाह वृक्षारोपण कार्यक्रमात’ 21 नोव्हेंबर रोजी केले.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी खंजेरी वादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून गुरूकुंज आश्रम, मोझरी येथील तुकाराम दादा विचारपिठाचे समन्वयक रवी मानव, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक चांभारे, कॅप्टन मोहन गुजरकर, राजेंद्र घोडमारे, दामोदर राऊत, गुणवंत डकरे, प्रा. रविंद्र गुजरकर, अशोक सावरकर, सुधाकर चरडे, राजकुमार वासेकर, वैशाली गुजरकर, वनिता भोयर, सौ. थुटे व निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.
कॅप्टन मोहन गुजरकर यांची कन्या सोनल व विनायक चांभारे यांचे सुपुत्र पारस यांनी विवाह वृक्षरोप लावून वृक्षारोपणाच्या कार्याला आपण प्रोत्साहन देणार असे आश्वासन या प्रसंगी उपस्थित मानयवरांसमोर दिले.
या वेळी भाऊसाहेब थुटे, रवी मानव, कॅप्टन मोहन गुजरकर व विनायक चांभारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. रविंद्र गुजरकर यांनी तर आभार वैशाली गुजरकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ‘तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा……..या प्रार्थना गीताने बाळकृष्ण हांडे यांनी केली.