Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती शहरात अवैध वाहतूक जोमात

कोंबून प्रवाशी भरलेल्या वाहनाकडे पोलिसांचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- हा तालुका अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. याच अतिदुर्गम भागातील काही गावात व जिवती शहरात अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर त्यांचा वचक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूकदार दिवसभरात चार ते पाचदा तालुक्यातील गाव खेड्यातून तालुक्यात येणे-जाणे करतात. गडचांदूर, शेणगाव, पाटण, कुंभेझरी, परमडोली, येल्लापूर येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. वाहनधारक जादा पैसा मिळविण्याच्या हेतूने वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवितात. यामुळे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली

आहे. जादा प्रवासी वाहतुकीमुळे वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे एस.टी.बस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरुन आपापल्या दिशेने रवाना होतात. यामुळे एस.टी.प्रशासनाला चुना तर लागतोच, शिवाय नागरिकांनाही जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीस वेळीच आळा घालून वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने सर्रास पोलीस ठाण्यासमोरून धावतात.तरीही येथील वाहतूक पोलीसाकडून कागदपत्रांची तपासणी केली जात नाही. चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, वाहन फिटनेस प्रमाणपत्रांची तपासणीच होत नाही.वाहनात प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा नसताना व क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असतानाही पोलीस दुर्लक्ष करतात. त्यांना हात दाखविण्याची हिम्मतही पोलीस करीत नाही. यामुळे अशा वाहनांचा अपघात होऊन नागरिकांचा बळी गेल्यास यास जबाबदार कोण? व अपघातांत नागरिकांचा बळी गेल्यास वाहतूक पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे पोलिसांचे दुर्लक्ष

अवैध प्रवासी वाहतुकीकडे ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात. वाहनधारकांकडून दरमहा ठरावीक रक्कम उकळत असल्याचे बोलले जात आहे. व संबंधित कर्मचारी तेच ‘लाभाचे पाट’ वरिष्ठांपर्यंत तर पोहोचवीत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन जनतेच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी अपेक्षा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये