ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनधिकृत बॅनर, होर्डिंगवर मनपाची मोठी कारवाई

परवानगी न घेतल्यास बॅनर प्रिंटर्स व्यवसायिकांना जबाबदार धरणार

चांदा ब्लास्ट
महानगरपालिका हद्दीत परवानगी न घेता अनधिकृत बॅनर, होर्डिंग, स्टिकर्स लावणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जात आहे. महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या तपासणीमध्ये परवानगी नसलेल्या बॅनरची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे.  रीतसर परवानगी घेऊनच बॅनर- होर्डिंग लावण्यात यावेत, अन्यथा बॅनर प्रिंटर्स व्यवसायिकांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अनधिकृत बॅनर, होर्डिंग, स्टिकर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडते. तसेच, यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि इतर समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बॅनर, होर्डिंग, स्टिकर्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी शहरातील सर्व बॅनर प्रिंटिंग व्यवसायाची बैठक घेण्यात आली. यात सर्व सूचना देण्यात आल्या होत्या.
महानगरपालिकेच्यावतीने १२ नोव्हेंबर २०२३ रोजी तिन्ही झोनमध्ये अनधिकृत बॅनर, होर्डिंग, स्टिकर्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीत झोन क्र. १ मध्ये ३४ बॅनर्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १६ बॅनर परवानगीसह लावण्यात आले होते, तर १८ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते. झोन क्र. २ मध्ये ६३ बॅनर्सची तपासणी करण्यात आली.
 त्यापैकी १६ बॅनर्स परवानगीसह लावण्यात आले होते, तर ४७ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते. झोन क्र. ३ मध्ये १८ बॅनर्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५ बॅनर्स परवानगीसह लावण्यात आले होते, तर १३ बॅनर्स परवानगीशिवाय लावण्यात आले होते.
महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर  उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते. मात्र अनेकदा टॅक्स न भरता व परवानगीही न घेता बॅनर इत्यादी लावण्यात येतात. मात्र, आता कड्क कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात बॅनर लावताना बॅनरवर परवानगी पत्राची प्रत, प्रिंटर्स व्यवसायिक आस्थापनेचे नाव आणि कालावधी नमूद करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परवानगीशिवाय बॅनर, होर्डिंग, स्टिकर्स लावणाऱ्यांवर महानगरपालिका अधिनियम अन्वये दंडाची तरतूद आहे. तसेच, अशा बॅनर, होर्डिंग, स्टिकर्स काढून टाकण्यासाठी खर्चही संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये