वाघाच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू
तालुक्यातील घोडपेठ येथील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गोठ्यात बांधून असलेल्या एका गाभण गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना तालुक्यातील घोरपेठ येथे दिनांक 30 रोज सोमवारला पहाटेच्या वेळेस उघडकीस आली.या गाईच्या मृत्यूमुळे गाय मालकाचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घोरपेठ येथील सिताराम नवले यांचा गावाच्या कडेला घराला लागून गोठा आहे. या गोठ्यात त्यांची पाळीव जनावर बांधलेली होती.
मध्यरात्रीनंतर एका वाघाने गोठ्यात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या एका गाभण असलेल्या जर्सी गायीवर हल्ला करून तिला ठार केले. सकाळी सदर घटना नवले यांच्या लक्षात आली. घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर वाघ हा घोरपेठ गावापर्यंत आल्यामुळे गावातील गावकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.