ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानंतर प्रोत्साहनपर लाभ निकषांतर्गत अपात्र सभासदांची यादी प्रसिद्ध

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना - 2019 अपात्र यादी संदर्भात अडचणी असल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात संपर्क करावा

चांदा ब्लास्ट

    महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये, लाभार्थी अपात्र का झाला, हे जाणून घेण्याचा अधिकार संबंधित लाभार्थ्यांना आहे. त्यामुळे अपात्र लोकांची यादी तातडीने प्रसिद्ध करावी, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार संबंधित यादी शासनाकडून प्राप्त करून घेण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच सहायक निबंधक तालुका कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 प्रोत्साहनपर लाभ योजनेला जुलै 2022 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यात चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेमार्फत 57 हजार 357 कर्ज खाते पोर्टलवर अपलोड करण्यात आले. अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी 36 हजार 608 कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला. यापैकी 36 हजार 152 कर्जदार सभासदांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांच्या खात्यात शासनामार्फत प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे 145 कोटी 18 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम म्हणून जमा करण्यात आले आहे.

शासनस्तरावर निकषांतर्गत अपात्र ठरविलेल्या 6 हजार 418 सभासदांची यादी तसेच फक्त एकच वर्ष कर्जाची परतफेड करणाऱ्या 15 हजार 922 अपात्र कर्जदार सभासदांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. सदर यादी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच सहाय्यक निबंधक तालुका कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या संबंधित लाभार्थी सभासदांनी याबाबत नोंद घ्यावी. तसेच याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रशांत धोटे यांनी केले आहे.

प्रोत्साहनपर लाभ निश्चित

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी आणि त्यांनी एक/अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

हे लोक ठरतील अपात्र

  1. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019 अंतर्गत कर्ज माफिचा लाभ मिळालेले शेतकरी. 2. महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य. 3. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी (एकत्रित मासिक वतेन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून). 4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वतेन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून). 5. शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ति. 6. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून). 7. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बैंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ (एकत्रीत मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ).

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये