पदवीधर निवडणुकीची प्रक्रिया संपताच आमदार किशोर जोरगेवार यांनी नजूलधारकांच्या प्रलंबित प्रश्नाला प्राधान्य देत कामाला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहरातील पात्र नजूलधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे मिळावेत आणि पट्टेवाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, यासाठी त्यांनी मुंबई मंत्रालयात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी पट्टेवाटप प्रक्रियेतील विविध अडचणी दूर करून पात्र नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चंद्रपूर शहरातील अनेक नागरिकांचा नजूल जमिनींच्या पट्टेवाटपाचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. या नागरिकांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळावेत, यासाठी आमदार किशोर जोरगेवार सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही व्हावी, यासाठी त्यांनी आता प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या भेटीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी नजूल जमिनींचा ड्रोन सर्व्हे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. सर्वेक्षणाअभावी किंवा प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे पात्र नागरिकांना पट्टे मिळण्यास अडथळे येऊ नयेत, यासाठी सर्वेक्षणाचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्या नागरिकांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाली आहेत, त्यांच्या पट्टेवाटपाची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
पट्टे वाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचार्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार जोरगेवार यांनी केली. संबंधित कामांसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.