ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीचे ॲड. आशिष बोरकर यांची न्यायाधीशपदी नेमणूक

शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      शिवसेना पक्षाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी भद्रावतीचे सुपुत्र ॲड. आशिष जयेंद्र बोरकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला आणि न्यायाधीशपदी निवडीबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) परीक्षा 2022 मध्ये ॲड. बोरकर यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण भद्रावती शहरात आनंदाचे वातावरण आहे.

या परीक्षेत राज्यभरातून हजारो वकील सहभागी झाले होते. ही निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडली – पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत. ॲड. बोरकर यांनी पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज मधून एलएलबी पूर्ण केली असून एलएलएम (संवैधानिक कायदा) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी सहा वर्षे वकिलीचा अनुभव घेतला. प्रॅक्टिस चालू असतानाच त्यांनी या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती.

मुकेश जिवतोडे यांनी यावेळी सांगितले की, “चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर कोणतंही स्वप्न साकार करता येतं. ॲड. आशिष बोरकर यांचं यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”

भद्रावतीच्या भूमीला लाभलेला हा यशाचा मानबिंदू असून, शिवसेना परिवारातर्फे ॲड. आशिष बोरकर यांना पुढील न्यायिक कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.

यावेळी भद्रावती नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक राजू सारंधर, दिनेश यादव,अमित निब्रड,संदीप मेश्राम व आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये