ताज्या घडामोडी

मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग – चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा संपन्न

सुधीर मुनगंटीवार व अशोक नेते ह्यांना विजयी करण्याचे केले आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर तसेच गडचिरोली लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार अनुक्रमे सुधिर मुनगंटीवार व अशोक नेते ह्यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या जाहीर सभेचे आयोजन 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले होते. ह्या सभेला दोन्ही लोकसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांसह लाखभर नागरिक दुपारपासून मोरवा विमानतळाजवळील मैदानात उपस्थित होते.

लाखभर नागरिकांच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठीच मंचावर दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री, शिघ्रकवी, आंबेडकरी नेते रामदास आठवले ह्यांचेसह केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. बंटी भांगडिया, आ. किशोर जोरगेवार, माजी आ. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा ह्यांचे सह महायुतीच्या सर्व पक्षाचे महत्वाचे नेते मंचावर उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार व अशोक नेते ह्यांच्या विजयासाठी एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस ह्यांनी मतदारांना आवाहन केले असुन चंद्रपुरातून निवडणुकीनंतर उडणाऱ्या चंद्र यानात दोन्ही सक्षम उमेदवार उड्डाण करून दिल्लीतील संसद भवनात लँडिंग करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी व्यक्त केला.
माता महाकालीच्या आशिर्वादाने महायुती चांद्यापासून थेट बंद्यापर्यंत यशस्वी घोडदौड करून दिल्लीत मोदींना भक्कम साथ देण्यास सज्ज असुन विजय रथाची सुरुवात चंद्रपूर पासुन होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी व्यक्त केला असुन चंद्रपूरच्या जनतेने विजयी गुलाल उधळून मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

सुधिर मुनगंटीवार ह्यांनी आपल्या संबोधनात विरोधी उमेदवाराचे नाव न घेता आपण आपल्या आमदारकी तसेच मंत्रिपदाच्या काळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला तसेच देशी दारूच्या एका दुकानाचे सतरा दुकान करणे म्हणजे विकास आहे का असा खोचक प्रश्न उपस्थित करून प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार असलेल्या क्षेत्रात त्यांनी काय विकासकामे केली असा प्रश्न उपस्थित करताना त्यांच्या क्षेत्रात आपण कोण कोणती विकासकामे केली हे सांगताना त्यांनी केलेली कामे दाखविण्याचे आव्हान दिले.

चंद्रपूरच्या जनतेशी चक्क मराठीत संवाद साधत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना मराठीतल्या म्हणींचा माध्यमातून काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली. ही निवडणूक स्थैर्य व अस्थैर्य ह्यामध्ये होत असुन इंडी आघाडी देशात अस्थैर्य निर्माण करत असल्याची टीका केली.

काँग्रेस सरकार सत्तेत असताना दलीत, आदिवासी व मागास नागरिकांच्या वस्त्यांमध्ये शिक्षण, घरे, वीज, पाणी, रस्ते ह्यासारख्या मूलभूत सोई सुद्धा दिल्या जात नव्हत्या मात्र मोदी सरकारने वंचितांना न्याय देण्याची गॅरंटी दिली होती आणि मोदी गॅरंटीने है करून दाखविले आहे.

आम्ही सत्तेत आल्यानंतर 5 कोटी जनतेला आयुष्मान भारत येजनेतून वैद्यकीय सुविधा प्राप्त करून दिली असुन देशातील जवळपास 11 कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधी दिल्या जात आहे आणि ह्याचे श्रेय कुणाला असे त्यांनी जनतेला विचारले असता जनतेने मोदींना श्रेय देताच त्यांनी हे चुकीचे असुन ह्याचे श्रेय जनतेच्या मताला असल्याचे सांगितले.

धार्मिक आधारावर देशाचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस पक्षाने काश्मीर मधे समस्या निर्माण केली, देशात दहशतवाद निर्माण केला मात्र मोदी सरकारच्या काळात दहशतवाद संपुष्टात आणला असुन काश्मीर समस्या मार्गी लावुन देशात शांतता प्रस्थापित केली. राम मंदिराच्या निर्माण कार्यात अडथळे निर्माण करणाऱ्या तसेच दहशतवाद्यांना फाशी देण्यात येऊ नये ह्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी घेण्यास बाध्य करणारा काँग्रेस पक्ष आम्ही संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवतो मात्र त्यांच्याच घोषणापत्रात सांगितले असुन ह्या पक्षाची विचारधारा करल्यासारखी असुन ज्याप्रमाणे कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच असते त्याप्रमाणे ह्यांचा गुणधर्म असुन ते देशाच्या विकासापेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार करतात आणि जिथे जिथे सत्तेत येतात तिथे भ्रष्टाचार करतात अशी घणाघाती टीका केली.
चंद्रपूरच्या भूमीतील उच्च गुणवत्तेच्या लाकडांनी श्रीराम मंदिर तसेच नव्या संसद भवनाच्या निर्माणात महत्वाचे योगदान दिले असुन उच्च गुणवत्तेचे विकासाची दृष्टी असलेले उमेदवार सुधिर मुनगंटीवार संसद गाजवून चंद्रपूर सह देशाचे नाव उज्वल करतील अशी ग्वाही देऊन आगामी 19 एप्रिल रोजी लोकशाहीच्या मंगलमय उत्सवात हिरीरीने सहभागी होऊन मतदानाचा उच्चांक गाठण्याचे आवाहन केले.

क्षणचित्रे

👉 पडोली ते मोरवा अशा 5 किमीच्या परिसरात        वाहनांची रांगच रांग.
👉 लाखभर नागरिकांच्या गर्दीने फुलला परिसर
👉चंद्रपूर झाले भगवामय
👉मोदी मोदी च्या गजराने आसमंत दुमदुमला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये