ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामूहिक वनहक्क दावे मंजूर असलेल्या जागेवर वनविभागातर्फे वृक्षलागवड

वनविभागाची अतिक्रमण धारकांवर बळजबरी : शिवसेना शिंदे गटाचा पत्रपरिषदेत आरोप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : सामूहिक वनहक्क दावे मंजूर असतानाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित शेतकऱ्यांकडून बळजबरीने जमीन हिसकावून वृक्षलागवड केली जात आहे. शेतकऱ्यांची जमीन बळकावून त्यांना भूमिहिन करण्याचे षडयंत्र वनविभागाकडून सुरू हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा आणि वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी व शेतकऱ्यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

चंद्रपूर तालुक्यातील आरवट आणि चोरगाव येथील अतिक्रमित वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दावे मंजूर आहेत. चोरगाव येथील ९९५ हेक्टर आणि आरवट येथील १७४ हेक्टरमधील शेतजमिनीवर शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावून या जमिनी हिसकावून घेत वृक्षलागवड केली जात आहे. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अपिल अर्जावर जिल्हास्तरीय समितीमार्फत जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वनविभागाने दावेदारांच्या भोगवट्यातील वनभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करू नये असे आदेश दिलेले असताना वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. महेशकर यांनी शेतकऱ्यांवर भारतीय जीव संरक्षण अधिनियमांतर्गत खोटे गुन्हे दाखल करून वर्षानुवर्षांपासून कसत असलेल्या जमिनीवर वृक्षलागवड सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले असून, अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, वरिष्ठ वनाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध मोहिमेला गती देऊन शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली. सध्या शिक्षकांवर बीएलओचे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेला ब्रेक लागला आहे. अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. ही मुले गुन्हेगारीकडे वळू शकतात. त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम गतीने राबविण्याची मागणी जिल्हाधिकारी गौडा यांच्याकडे केली असल्याचे त्यानी सांगितले. वरोरा येथे उजेडात आलेल्या स्वस्त धान्य तस्करी प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये