ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने आयोजित पथनाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर प्रथम तर आनंदनिकेतन महाविद्यालय, वरोरा व्दितीय, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी तृतीय

चांदा ब्लास्ट

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, जिल्हा शासकीय रूग्णालय, चंद्रपूर तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित पथनाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा राज्यात युवा महोत्सव कार्यक्रमांतर्गत सर्वच जिल्ह्यात रेड रिबन नाट्य स्पर्धा अंतर्गत ही पथनाट्य स्पर्धा रेडक्रॉस भवन, रोटरी सभागृह येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचे विधीवत उद्घाटन प्रमुख अतिथी जिल्हा उप शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर व रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव यांनी व्दिप प्रज्वलन करून केले.
यावेळी मंचावर रोटरी क्लब चंद्रपूरचे सचिव कुंजबिहारी परमार, एड्स नियंत्रणचे कार्यक्रम अधिकारी सुमंत पनकंटीवार, रोटरीचे प्रकल्प निर्देशक रवींद्र जुनारकर उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा उप शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर यांनी या पथनाट्य स्पर्धेच्या आयोजना मागील शासनाची भूमिका सांगितली. आज देशाचा प्रमुख आधारस्तंभ असलेला युवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी नशेच्या आहारी जात आहेत. लैगिक शिक्षणाचा अभाव, पुरेसे ज्ञान नाही, त्यामुळे समाजात एड्स सारखा भयावह आजार बळावतो आहे. आजची परिस्थिती अतिशय भयावह आहे, अशा कठीण प्रसंगी समाजात या भयावह आजाराबद्दल समज गैरसमज दोन्ही आहेत. लोकांना आजाराची सत्य माहिती व्हावी आणि जनजागृतीसाठी ही स्पर्धा आयोजिल्याचे सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव यांनी आपल्या भाषणात, गेल्या ४८ वर्षापासून रोटरी क्लब या जिल्ह्यात सामाजिक कार्यांत सदैव अग्रेसर राहिला आहे. एचआयव्ही जनजागृती कार्यक्रमातही रोटरी राज्य शासनासोबत काम करित आहे. कुठल्याही सामाजिक कार्यात सहभाग हवा वाटतो तिथे रोटरी धावून जाते. भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याची ग्वाही याप्रसंगी दिली.
कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनीही गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. या स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण १४ महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज तथा सामाजिक संंस्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ग्रामगीता महाविद्यालय, चिमूरने पटकाविला, आनंदनिकेतन महाविद्यालय, वरोरा व्दितीय, तर ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला. गडचांदूर उपरवाही येथील कौशल्य तथा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला प्रोत्साहनपर बक्षिस देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण राखी देशमुख, मनिषा पडगिलवार, रोशन आकुलवार, आस्मा पठाण या परिक्षकांनी केले.
 स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तर प्रमुख पाहुण्यांना रोटरी क्लबच्या वतीने स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. रोटे. मनिषा पडगिलवार यांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविक रवींद्र जुनारकर यांनी केले. संचालन निरंजन मंगरूळकर यांनी तर आभार सुमंत पानगंटीवार यांनी मानले. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सहसचिव मिलिंद बोडखे, कोषाध्यक्ष रवींद्र जैन, मनिषा पडगिलवार, मधुसूदन रूंगठा, प्रदीप पवार, नविन चोरडीया, अमोल धकाते, अरूण तिखे, डॉ.बालमुकूंद पालिवाल यांच्यासह महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय यशस्वी या स्पर्धेचा शेवट स्वादीष्ट भोजनाने झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये