करंजीत आज संविधानिक मूल्यांचा जागर; कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
तुषार सूर्यवंशी यांचे सामाजिक प्रबोधनात्मक कीर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या करंजी गावात संविधान सन्मान दिवस, शहीद बिरसा मुंडा जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त संविधानिक मूल्यांचा जागर घडविणाऱ्या तुफानी विनोदी व प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन आज, रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गांधी चौक, करंजी येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष रावत, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर तथा महासचिव प्रदेश काँग्रेस, ज्येष्ठ काँग्रेस नेते किशोर वडेट्टीवार, गीता वडेट्टीवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर, सुरेश चौधरी, कमलेश निमगडे तसेच करंजी गावातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सन्मान कर्तृत्वाचा’ या उपक्रमांतर्गत गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर कुंदावार, सेवानिवृत्त शिक्षक नारायण तेलकापल्लीवार आणि न्यूरोसर्जन डॉ. आशिष तेलकापल्लीवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांचा विनोदी व प्रबोधनात्मक कीर्तन सादर करणार असून सामाजिक प्रबोधनासोबतच संविधानातील मूल्ये, समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सर्व पदाधिकारी, कृषी सेवा मंडळ, वीर बिरसा ब्रिगेड, युवासेना आणि क्रांतीबा ज्योतिबा महात्मा फुले युवा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधनात्मक कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



