ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानिर्मितीच्या आंतर विद्युत केंद्र बाह्यगृह क्रीडास्पर्धेचे आयोजन

राज्यभरातील ११ संघांच्या ६५० खेळाडूंचा सहभाग ; क्रीडा रसिकांसाठी पर्वणी

चांदा ब्लास्ट

विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावेत तसेच त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा या हेतूने महानिर्मितीच्या आंतर विद्युत केंद्र बाह्यगृह क्रीडास्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदा हे यजमानपद चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने स्वीकारले आहे.

 सदर क्रीडास्पर्धेचे उदघाटन सोमवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता खुले रंगमंच ऊर्जानगर (चंद्रपूर) येथे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन, संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक(संचलन) संजय मारुडकर, संचालक(प्रकल्प) अभय हरणे, संचालक(खनिकर्म) डॉ.धनंजय सावळकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, राजेश पाटील, नितीन चांदुरकर, डॉ.नितीन वाघ, पंकज नागदेवते तर मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 तीन दिवसीय बाह्यगृह क्रीडास्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, मैदानी स्पर्धा इत्यादी खेळांचा समावेश असून चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ, नाशिक, परळी, उरण, मुंबई, पोफळी, पुणे-नाशिक अश्या औष्णिक ,जल, वायू, नवीकरणीय ऊर्जाचे जवळपास ६५० खेळाडू सहभागी होणार आहेत. ऊर्जानगरातील अधिकारी मनोरंजन केंद्र व खुले रंगमंच मैदानावर हे सामने खेळल्या जाणार आहेत.  महानिर्मितीच्या नामवंत तसेच प्रतिभासंपन्न अनुभवी व नव्या खेळाडूंच्या सहभागामुळे ही क्रीडा स्पर्धा अतिशय चुरशीची आणि दर्जेदार होणार आहे.

राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने गिरीश कुमरवार, मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली असून आयोजनाचे काम अंतिम टप्प्यात आहे तर क्रिकेट सामने २ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहेत.

महानिर्मितीच्यावतीने मानव संसाधनांना विशेष महत्व तसेच प्रोत्साहन देण्यात येत असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. तरी, क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन गिरीश कुमरवार, मुख्य अभियंता यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये