ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ गोंडपिपरीत सहविचार सभा उत्साहात संपन्न
राजुरा विधानसभा काँग्रेस आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे संयुक्त आयोजन ; महाविकास आघाडीच्या प्रचाराला बळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजितदादा वंजारी यांच्या प्रचारार्थ गोंडपिपरी येथे राजुरा विधानसभा काँग्रेस आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या प्रचाराला गती देणे आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधणे, हा या सभेचा प्रमुख उद्देश होता. सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, पदवीधर आमदार अँड. अभिजितदादा वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राचार्य जांभुळकर मॅडम, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर, शहराध्यक्ष राजू झाडे, अशोकराव चौधरी, रविकिरण तावाडे, मोटघरे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या पाठिंब्याने ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचाराला व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सभेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले असून, पदवीधर मतदारांपर्यंत महाविकास आघाडीची भूमिका पोहोचविण्यासाठी समन्वित प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.



