लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे पाच खेळाडू राज्यस्तरावर
तायक्वांदो व बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागपूर येथील मानकापूर स्टेडियममध्ये पार पडलेल्या तायक्वांदो तसेच वरोरा येथे पार पडलेल्या बॉक्सिंग विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावतीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.
तायक्वांदो स्पर्धेत १७ वर्षांखालील गटातून मयुरेश खेमस्कर, अनुकल्प मेनके तसेच लोकमान्य ज्ञानपीठ, भद्रावतीची विद्यार्थिनी मानसी पॉल यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हे तिन्ही खेळाडू मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
त्याचबरोबर वरोरा येथे झालेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात आरुषी बेतवार व तन्वी कुटेमाटे यांनी विजयी कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. या दोन्ही खेळाडू परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या सर्व खेळाडूंच्या उल्लेखनीय यशामुळे लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावतीच्या शिरपेचात जणू मानाचा तुरा रोवला गेला आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य रूपचंद धारणे सर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, गोपालज ठेंगणे, नामदेव कोल्हे, उल्हास भास्करवार, अमित गुंडावार,सचिन सरपटवार, अविनाश पाम्पट्टीवार, उमाकांत गुंडावार, संजय पारधे, क्रीडा प्रमुख राजेश्वर मामीडवार, संघ व्यवस्थापक प्रणिता शेंडे, मुंजे मॅडम, नितीन लांजेवार, विशाल गावंडे, पवन गौरकार, रवींद्र नंदनवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक आदर्श कापरकर, लता इंदूरकर तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू चमकदार कामगिरी करून महाविद्यालयाचे तसेच नागपूर विभागाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



