उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू? पतीसह सासरच्यांवर गुन्हा
राहेरीच्या स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर हिच्या मृत्यूप्रकरणी पित्याची तक्रार; पाचोड पोलिसांत FIR दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा : तालुक्यातील राहेरी येथील स्वाती ऊर्फ समीक्षा निंबाळकर या ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मुलगी आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे वडील सदाशिव शंकर देशमुख यांनी तक्रारीत केला आहे.
देशमुख यांच्या तक्रारीनुसार, स्वाती ऊर्फ समीक्षा हिचा विवाह ३० मार्च २०२१ रोजी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील विशाल अनिल निंबाळकर याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचा काळ सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच माहेरून दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
गर्भधारणेदरम्यान स्वातीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते. ६ सप्टेंबर २०२६ रोजी तिला सृष्टी हॉस्पिटलमध्ये नेले असता गर्भातील पाण्याचे प्रमाण कमी असून बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तातडीने रुग्णालयात दाखल करून सिझेरियन करण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
मात्र, डॉक्टरांच्या सूचनेनंतरही तिला रुग्णालयात दाखल न करता घरी आणण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी स्वाती ऊर्फ समीक्षा हिचा मृत्यू झाला. तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, FIRमध्ये २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१० वाजता घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पाचोड पोलिस ठाण्यात FIR क्रमांक ०४०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ८५, १०६(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल रंगनाथ निंबाळकर, सासू शारदा अनिल निंबाळकर तसेच अश्वर्या नावाच्या एका महिलेवर आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास पाचोड पोलिसांकडून सुरू असून, मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण, उपचाराची आवश्यकता आणि उपचार मिळण्यात विलंब झाला का, याबाबत वैद्यकीय अहवाल व तपासातून वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तक्रारीतील आरोपांबाबतही तपासाअंतीच पुढील बाबी स्पष्ट होतील.



