ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालक सचिव मिलींद म्हैसकर यांनी केली पिकपरिस्थितीची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलींद म्हैसकर यांनी आज सेलू तालुक्यातील सेलडोह येथील वैभव सोनटक्के यांच्या शेतातील सोयाबिन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत कापूस, तूर व सोयाबिन पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जीवन कतोरे, तहसिलदार डॉ.शंकुतला पाराजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, तालुका कृषि अधिकारी रविंद्र राऊत आदी उपस्थित होते.

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा होता. यावेळी मिलींद म्हैसकर यांनी शेतकऱ्याशी संवाद साधला. मागीलवर्षीच्या सोयाबिन, कापूस व तूर पिकाच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती घेतली. गेल्यावर्षी सोयाबिनचे पिक पुर्णपणे नष्ट झाल्याचे शेतकऱ्यानी सांगितले. तसेच गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा फारच कमी उत्पन्न झाले असल्याचे शेतकरी म्हणाले. यावर्षी वेळोवेळी पाऊस आल्यामुळे सोयाबिन पिक बऱ्या प्रमाणात असून सरासरी पेक्षा 25 ते 30 टक्के कमी पिक होण्याची शक्यता आहे, असे शेतकरी म्हणाले. तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे तूर पिक सुध्दा कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यात सरासरी 70 टक्के पाऊस झाला असून काही तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. मध्यंतरी पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबिन पिकाचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात 25 ते 30 टक्के सरासरी उत्पन्न कमी होण्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्या कापूस पिक चांगले असले तरी यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते. यावर उपाययोजना करण्यासाठी अळीनाशक फवारणीसाठी ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना यावेळी देण्यात आल्यात. यावेळी शेतकामासाठी मजूर, येणाऱ्या अडचणी, शेतपिकांचे भाव, बाजारपेठ आदी बाबतही शेतकऱ्यांशी मिलींद म्हैसकर यांनी सविस्तर चर्चा केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये