ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री भारत माता मंदिर लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

नंदापूर येथे राष्ट्रप्रथम संकल्पनेतून साकारलेला भव्य प्रकल्प; ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : प.पू. सद्गुरू ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या ‘राष्ट्रप्रथम’ या संकल्पनेतून नंदापूर येथे समृद्धी महामार्गालगत साकारण्यात येत असलेल्या श्री भारत माता मंदिराच्या भव्य वास्तूचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात भारतमातेच्या मूर्तीची स्थापना व लोकार्पण करण्यात येणार असून, या सोहळ्यास सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी केले आहे.

श्री भारत माता मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी उद्योजक व समाजसेवक घनश्याम शेठ गोयल राहणार आहेत.

या भव्य मंदिर वास्तूची एकूण उंची १०० फुटांपेक्षा अधिक असणार आहे. मंदिर परिसरात सुमारे ४ हजार चौरस फुटांचा भव्य हॉल असून, त्यामध्ये ५ फूट उंचीची भारतमातेची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येत आहे. याच मूर्तीची पहिल्या टप्प्यात स्थापना व लोकार्पण होणार आहे.

स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा देणारे चित्र प्रदर्शन व ग्रंथालय

मंदिरातील भव्य हॉलमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील विविध घटनांचे चित्र प्रदर्शन तसेच ग्रंथालय उपलब्ध असणार आहे. भावी पिढीला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, क्रांतिकारकांची व हुतात्म्यांच्या त्यागाची ओळख व्हावी, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.

मंदिराच्या वास्तू बांधकामातही भारतीय संस्कृती व स्थापत्यकलेचे विविध पैलू साकारण्यात येणार आहेत. लाल किल्ल्याची प्रतिकृती, कोणार्क मंदिराचे चक्र, अजिंठा लेणीची कमान तसेच दक्षिण व उत्तर भारतीय बांधकाम शैलीची वैशिष्ट्ये या वास्तूमध्ये पाहायला मिळणार आहेत.

राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा संकल्प

राष्ट्रमाता, गोमाता आणि गंगामाता यांना आपल्या शास्त्रांनी मातृत्वाची मान्यता दिली आहे. समता व समरसतेच्या संस्कारांचे अधिष्ठान असलेल्या भारतमातेच्या वैभवाचे दर्शन या प्रकल्पातून घडावे, अशी संकल्पना आहे.

स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या चरणी समर्पित करणाऱ्या क्रांतिकारी हुतात्म्यांची ओळख तरुण पिढीला व्हावी आणि त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन तरुणांच्या मनात नितांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी, या भावनेतून भारत माता मंदिर प्रकल्पाची निर्मिती होत आहे.

‘राष्ट्रभक्ती हीच ईश्वरभक्ती’ हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजावा आणि भारतमातेच्या चरणी सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी, या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या राष्ट्रकार्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने सहभागी व्हावे आणि हे ईश्वरी कार्य जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये