ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी वान्मथी सी

17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान ; नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सर्व विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्या.

जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, श्रीपती मोरे, अनिल गावित, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

अभियानाच्या कालावधीत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देतानाच प्रलंबित दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करावे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे शक्य तितक्या जलदगतीने निराकरण करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.

अभियान केवळ शासकीय सेवा व योजनांपुरते मर्यादित न ठेवता स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आणि रस्ते सुरक्षा यांसारख्या विषयांवरही विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. तसेच अनाथालये व वृद्धाश्रमांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधावा, त्यांच्या गरजा जाणून घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांमध्ये प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता उपक्रम आयोजित करून त्यांना आवश्यक डिजिटल व्यवहारांची माहिती द्यावी. त्याचप्रमाणे वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती तसेच रस्ते सुरक्षा अभियानालाही विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

गावभेटी, सेवा शिबिरे, विभागनिहाय उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत. स्थानिक उत्पादने, स्थानिक उद्योजक आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल उपक्रम प्रभावीपणे राबवावा. प्रत्येक विभागाने अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमांची माहिती, लाभार्थ्यांचा तपशील आणि योजनांच्या लाभाची आकडेवारी नियमितपणे संकलित करावी. कामाच्या प्रगतीचा डेटा अद्ययावत ठेवावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी महिनाभर लोककल्याणकारी उपक्रम राबवावे. या काळात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत विविध योजना कशा पोहोचतील याबाबत नियोजन करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये