ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध विकासात्मक बांधकामे करतांना दर्जावर लक्ष द्या – बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा ; वृक्षारोपण सामाजिक भावनेतून करण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ते, इमारती, पुल यासह विविध प्रकारची विकासात्मक बांधकामे केली जातात. ही कामे करतांना दर्जेदार झाली पाहिजे. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: वेळोवेळी कामांना भेटी देऊन दर्जा तपासावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थिती जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ.समीर कुणावार, आ.राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, माजी खासदार सुरेश वाघमारे, बांधकामचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता नरेंद्र बोरकर, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते यांच्यासह जिल्ह्यातील विभागाने अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक बांधकामे प्रलंबित असल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांना वेळेत कामे पुर्ण करण्याच्या सूचना द्या. केवळ दंड आकारून होणार नाही. संबंधितांना कालमर्यादा द्या, त्यावेळेतही कामे होत नसेल तर कंत्राटदारावर कारवाई करून दुसऱ्याकडून कामे पुर्ण करा. हे करत असतांना विभागाने कोणत्याही व्यक्तीस पाठीशी घालता कामा नये. विकासकामे वेळेत पुर्ण करण्यासाठी विभागाच्या सर्व अभियंत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे श्री.भोसले यांनी सांगितले

बांधकाम विभागाचे लेखाशिर्ष वगळता इतर हेडमध्ये कामे प्रलंबित राहण्याचे काहीच कारण नाही. आशियाई डेव्हलपमेंट बॅंक, हायब्रीड ॲम्युनिटी मॅाडेल, केंद्रीय मार्ग निधी, नाबार्डमधून मंजूर कामांना निधीची उपलब्धता आहे. त्यामुळे यातील कोणत्याही प्रकारची बांधकामे प्रलंबित राहू नये. कंत्राटदारांना सक्त सूचना देऊन यातील कामे वेळेत पुर्ण करा. जिल्ह्यात नवीन विश्रामगृहांसाठी प्रस्ताव द्या. डिसेंबर मध्ये सदर प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करू. बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता दुतर्फा वृक्षलागवड केली जाते. लागवड करतांना सामाजिक भावनेतून केली पाहिजे, असे श्री.भोसले म्हणाले.

*मंजूर कामे वेळेत पुर्ण करा : डॉ.पंकज भोयर*

पालमकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या योजनेतून मंजूर बांधकामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना केल्या. निधी नसल्याच्या कारणावरून कामे थांबवून नागरिकांना त्रास देता येणार नाही. पुर्वी बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय नागपूर येथे होते. आता ते चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याने जिल्ह्यासाठी गैरसोईचे होत आहे. वर्धा जिल्ह्याचे मंडळ कार्यालय नागपूर येथे असावे तसेच सेलू तालुक्यात हॅमअंतर्गत मंजूर कामे तातडीने पुर्ण करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

आ.समीर कुणावार यांनी हिंगणघाट तालुक्यात अनेक कामे मंजूर असतांना सुरु झाली नाही. हिंगणघाट- वर्धा मार्ग अतिशय वाईट दर्जाचा झाला आहे. याबाबत कंत्राटदाराला सक्त सूचना देऊन रस्ता व्यवस्थित करणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. देवळीमध्ये आशियाई डेव्हलपमेंट बॅंक, हायब्रीड ॲम्युनिटी मॅाडेल अंतर्गत मंजूर रस्त्यांची कामे, प्रलंबित बांधकामे, आंजी रुग्णालय बांधकामाचा विषय आ.राजेश बकाने यांनी उपस्थित केला. याबाबतीत अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री.भोसले यांनी मुख्य अभियंत्यांना दिले. अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण यांनी जिल्ह्यात विविध योजनेतून मंजूर मोठी बांधकामे, त्यांची सद्यस्थिती सादर केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये