ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिलकनगरमध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीविरोधात नागरिकांचा संताप

ट्रक-हायवांची दिवसरात्र वाहतूक; विद्यार्थी, कामगार आणि नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट

नगर परिषद व पोलीस प्रशासनाकडून तातडीने निर्बंध घालण्याची मागणी

घुग्घूस, चंद्रपूर : घुग्घूस येथील तिलकनगर परिसरातून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ट्रक, हायवा तसेच कोळसा व वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरिक, शालेय विद्यार्थी आणि कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या समस्येबाबत तिलकनगर परिसरातील नागरिकांनी 10 सप्टेंबर 2026 रोजी घुग्घूस नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तिलकनगर मार्गावरून सातत्याने अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या वाहनांमुळे धूळ, वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावर असुरक्षित परिस्थिती निर्माण होत असल्याची तक्रार आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच ड्युटीवर जाणारे आणि ड्युटीवरून परतणारे कामगार मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. अशा वेळी अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि वेगामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

‘प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का?’

नागरिकांचा थेट सवाल आहे की, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का, की त्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत? विद्यार्थ्यांची, कामगारांची आणि नागरिकांची नियमित वर्दळ असलेल्या मार्गावर दिवसरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू असेल, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियोजनाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे केवळ तक्रार नोंदवून न थांबता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी योग्य वेळेचे निर्बंध निश्चित करावेत अथवा आवश्यकता असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. तसेच तिलकनगर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मते, हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून जनसुरक्षेशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे परिसराची पाहणी करून वस्तुस्थितीची तपासणी करावी आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत स्पष्ट नियम व व्यवस्था लागू करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत घुग्घूस पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे. आता नागरिकांच्या या मागणीवर प्रशासन केवळ कागदोपत्री कार्यवाही करते की तिलकनगरमधील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रत्यक्षात ठोस नियंत्रण आणते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे निवेदन विनोद जंजर्ला, मनमोहन महाकाली, राजू चौधरी, रोहित गोर्रे, निखिल, राहुल, दीपक, वर्षित, वंशी, दुर्गास्वामी, संपत, विशाल, रवी आदी नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये