आमदारांच्या सासुरवाडीचा रस्ता खड्ड्यात..!
खड्ड्यांत वृक्षारोपण, कार्यक्रमस्थळी बॅनर झळकवत तरुणांचे आक्रमक आंदोलन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ विकासाच्या घोषणा, रस्त्यांच्या कामांचे आश्वासन आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचा गाजावाजा होत असताना तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः आमदारांची सासुरवाडी असलेल्या तोहोगाव परिसरातील रस्त्याच्या प्रश्नावर नागरिक व तरुणांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याऐवजी नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता, एका कार्यक्रमस्थळी बॅनर झळकावत तरुणांनी आक्रमक आंदोलन केले. “विकास हा नावालाच नव्हे, तर रस्त्यावरही दिसला पाहिजे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
परिसरात दरवर्षी विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, लावण्यात आलेल्या अनेक रोपांची पुढील देखभाल, संरक्षण आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वृक्षारोपणासाठी खर्च होतो; मात्र त्यानंतर रोपे जगली की नाही, याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये रोपे लावून तरुणांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपरोधिक प्रहार केला. “खड्डे बुजले नाहीत, म्हणून त्यात झाडे रुजविण्याची वेळ आली,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
*“सासुरवाडी विसरले का?” नागरिकांचा सवाल*
रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. असे असताना आमदार साहेब आपली सासुरवाडी विसरले का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
*आमदारांसमोर जनतेचा थेट प्रश्न*
“तालुक्याच्या विकासासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मग ग्रामीण भागातील मूलभूत रस्त्यांचा प्रश्न का सुटत नाही?” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागांना रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
*ठळक मुद्दे :*
*खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध.
*कार्यक्रमस्थळी बॅनर झळकवत तरुणांचे आक्रमक आंदोलन.
*रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त.
*वृक्षारोपणानंतर रोपांच्या संगोपनाकडे दुर्लक्षाचा आरोप.
*आमदारांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा थेट सवाल
*रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी.



