२० जणांपासून सुरू झालेली श्रमदान चळवळ २०० पार!
महापांढरवाणीत अकराव्या आठवड्यात बांबू लागवड; वनसंवर्धनासोबत गावातच रोजगारनिर्मितीचा ग्रामस्थांचा निर्धार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- अवघ्या २० ग्रामस्थांच्या सहभागातून जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या श्रमदान चळवळीने आता २०० हून अधिक ग्रामस्थांचा टप्पा गाठला आहे. सलग अकराव्या आठवड्यातही महापांढरवाणी ग्रामस्थांनी एकत्र येत वृक्षसंवर्धन आणि बांबू लागवडीसाठी उत्स्फूर्त श्रमदान केले. वनसंपत्तीचे संरक्षण, गाव परिसराचे हरितीकरण आणि त्यातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
जिवतीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल महापांढरवाणी गावात ग्रामस्थांनी सामूहिक पुढाकारातून ही श्रमदान चळवळ उभी केली आहे. वृक्षलागवड, बांबू लागवड, बांबूच्या थावड्या तयार करणे, वृक्षरक्षण बंधन आदी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. सुरुवातीला केवळ २० जणांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, आता २०० पेक्षा अधिक महिला, पुरुष आणि युवक या चळवळीत सहभागी झाले आहेत.
CFR क्षेत्राच्या संरक्षणासाठी ग्रामसभेचा ठराव
लागवड केलेल्या झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी बाराव्या आठवड्यात परिसराला कंपाऊंड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभेच्या निर्णयानुसार संपूर्ण CFR क्षेत्राच्या संरक्षणासाठी कंपाऊंड करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे.
यासंदर्भात सामूहिक वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच त्यातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.
‘गावातच रोजगार मिळावा’ ग्रामस्थांची मागणी’
श्रमदानातून गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांच्या श्रमाला आता रोजगाराची जोड मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत येरमी-येसापूरचे ग्रामसेवक नगराळे आणि रोजगारसेवक केशव कुमरे यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, गावाचा परिसर नंदनवन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गावपाटील मानकु धुर्वे यांनी गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्याची गरज व्यक्त केली. “आमच्या गावाला रोजगार मिळाला पाहिजे. गावातील लोकांना गावातच काम मिळाले तर गावाचा विकास अधिक वेगाने होईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अनिता धुर्वे यांनीही ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
VB-G RAM G योजनेतून रोजगाराचे मार्गदर्शन
ग्रामस्थांना रोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरमी-येसापूरचे मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विकसित भारत – रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात VB-G RAM G योजनेतून रोजगार मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी कामाची मागणी अर्जाद्वारे करावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ समाजसेवक व पेसा अभ्यासक संतोष सलाम यांनीही ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. VB-G RAM G योजनेची प्रक्रिया, ग्रामसभेची भूमिका तसेच वनलागवड, वनसंरक्षण आणि वनसंपत्तीच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मितीच्या शक्यता त्यांनी स्पष्ट केल्या.
घनदाट जंगलात उत्साहात बांबू लागवड
मार्गदर्शनानंतर समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत घनदाट जंगल परिसरात श्रमदानातून बांबू लागवड करण्यात आली. या उपक्रमात महिला, पुरुष आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
महापांढरवाणी ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. वनलागवड, बांबू लागवड, वृक्षसंवर्धन आणि CFR क्षेत्र संरक्षणासाठी ग्रामस्थ श्रमदान करण्यास तयार आहेत. मात्र या श्रमाला शासकीय रोजगाराची जोड मिळावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
“आम्ही श्रमदान करायला तयार आहोत; आता शासनाने आमच्या हाताला काम द्यावे!” या मागणीत महापांढरवाणीच्या श्रमदान चळवळीचा खरा गाभा सामावला आहे. वनसंवर्धनातून रोजगार आणि रोजगारातून गावाचा विकास, असा नवा आदर्श उभा करण्याच्या दिशेने महापांढरवाणी ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.



