गडचांदूरमध्ये ‘नमो उद्यान’ आणि नवीन अग्निशमन इमारतीचे भूमिपूजन
नागरिकांच्या सुविधा आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण विकासकामांना सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
औद्योगिक नगरी गडचांदूर शहरातील नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासोबतच शहराची सुरक्षितता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. ‘नमो उद्यान’ तसेच अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनामुळे शहराच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी, मोकळा वेळ घालवण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी एक चांगली सार्वजनिक जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचा लाभ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना होणार आहे.
महाराष्ट्रातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमो उद्यान’ उपक्रमात गडचांदूरचाही समावेश आहे. शहराच्या गरजा लक्षात घेऊन हे उद्यान दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात येणार असून, नागरिकांना आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे.
याचबरोबर अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन करण्यात आले. गडचांदूरचा वाढता विस्तार आणि औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अग्निशमन दलाला आवश्यक आणि अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही नवीन इमारत उभारण्यात येणार आहे.
आग, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला जलद प्रतिसाद देता यावा आणि त्याच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही इमारत महत्त्वाची ठरणार आहे.
एकीकडे नागरिकांच्या आरोग्य, विरंगुळा आणि आनंदासाठी ‘नमो उद्यान’, तर दुसरीकडे शहराच्या सुरक्षिततेसाठी सक्षम अग्निशमन सुविधा या दोन्ही विकासकामांमुळे गडचांदूर अधिक सुंदर, सुविधायुक्त आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल आहे.
या वेळी नगराध्यक्ष निलेश ताजणे, उपनगराध्यक्ष संजय मेंढी, बांधकाम सभापती रामसेवक मोरे, चेतन शेंडे, नगरसेविका अर्चना मोरे, सारिका डोर्लीकर, प्रणिता उपाध्ये, अश्विनी कांबळे , मनिषा परिचाके तसेच नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.



