महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अनिस खान होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आशिष देरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी IQAC समन्वयक डॉ. आर. वाय. पटले आणि डॉ. अजयकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते प्रा. आशिष देरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षणासोबतच खेळ हा व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक क्षमता, शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांची जिद्द, चिकाटी, शिस्त आणि देशासाठीचे योगदान आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उत्साह वाढविला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, आरोग्यविषयक जागरूकता आणि क्रीडाभावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.



