ताज्या घडामोडी

आता शासकीय धान्य विकाल तर खैर नाही!

पोंभुर्ण्यात गहू-तांदळाच्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर प्रशासनाची करडी नजर ; व्यापारी-लाभार्थ्यांना तहसीलदारांचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

*जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पत्रानंतर नोटीस जारी; साठेबाजी, विक्री अथवा हस्तांतरण आढळल्यास कठोर कारवाईसह शिधापत्रिका बंद करण्याचा इशारा*

पोंभुर्णा :_ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरीब व गरजू लाभार्थ्यांना स्वस्त दरात मिळणाऱ्या गहू-तांदळाची उचल केल्यानंतर परस्पर विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांसह शासकीय धान्य खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. पोंभुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात शासकीय धान्याच्या अनधिकृत खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने कडक निर्देश जारी केले असून, नियमभंग झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयाकडून २७ जुलै २०२६ रोजी तहसीलदार पोंभुर्णा यांना पत्र पाठविण्यात आले होते. पोंभुर्णा शहर तसेच तालुक्यातील काही खासगी व्यापाऱ्यांकडून शासकीय योजनेतून लाभार्थ्यांना मिळणारा गहू व तांदूळ उचलल्यानंतर खरेदी करून साठवून ठेवला जात असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पोंभूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश मंकीवार यांनी १५ जुलै रोजी या विषयाला धरून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला तक्रार अर्ज सादर करून कार्यवाहीची मागणी केली होती. याच तक्रारीची गंभीर दखल घेत नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*१२ ऑगस्टला तहसीलदारांची नोटीस..*

या पार्श्वभूमीवर तहसीलदार, पोंभुर्णा यांच्या कार्यालयाकडून १२ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस जारी करण्यात आली आहे. यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे, की शासकीय स्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या गहू व तांदळाची उचल केल्यानंतर त्याची अनधिकृत विक्री करू नये, तसेच खासगी व्यापारी, धान्य खरेदीदार किंवा अन्य व्यक्तींनी असे धान्य खरेदी करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय योजनेतून वितरित होणारे धान्य हे लाभार्थ्यांच्या अन्नसुरक्षेसाठी देण्यात येते. त्यामुळे त्याचा व्यावसायिक वापर, अनधिकृत विक्री, खरेदी किंवा इतरत्र हस्तांतरण करणे हे शासनाच्या योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासणारे ठरणार आहे.

*व्यापाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर ; साठेबाजी आढळली तर कठोरकारवाई..*

पोंभुर्णा शहर व तालुक्यातील सर्व खासगी व्यापारी, धान्य खरेदी-विक्री करणारे दुकानदार, धान्य विक्रेते तसेच इतर संबंधित व्यक्तींना शासकीय योजनेतून वितरित झालेला गहू-तांदूळ खरेदी करू नये, असे निर्देश तहसील कार्यालयाच्या नोटीसीतून देण्यात आले आहेत. दरम्यान, काही लाभार्थी स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलल्यानंतर ते व्यापाऱ्यांना विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाने लाभार्थ्यांनाही स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे स्वस्त धान्याचा गैरवापर करणाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.शासकीय धान्याची साठेबाजी, अनधिकृत खरेदी-विक्री, गैरव्यवहार किंवा इतरत्र हस्तांतरण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यापारी अथवा व्यक्तीविरुद्ध अन्नसुरक्षा, अत्यावश्यक वस्तू व सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित कायदे, नियम व शासन आदेशांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

इतकेच नव्हे तर नियमभंग करणाऱ्या लाभार्थ्यांच्या शासकीय धान्याच्या लाभावरही परिणाम होऊ शकतो. गरज भासल्यास संबंधित लाभार्थ्यांचा धान्य लाभ अथवा शिधापत्रिका बंद करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते, असेही तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे गरजू कुटुंबांच्या अन्नसुरक्षेसाठी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी ते विक्रीसाठी वापरू नये आणि व्यापाऱ्यांनीही अशा धान्याची खरेदी करू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता लागू असलेल्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याने पोंभुर्णा तालुक्यातील धान्य व्यापारी तथा लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता नोटीसनंतर प्रत्यक्षात किती व्यापारी आणि लाभार्थी कारवाईच्या कचाट्यात येतात, तसेच शासकीय धान्याच्या अनधिकृत व्यवहाराला प्रशासन कितपत आळा घालते, याकडे पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये