सेलू शहरात धार्मिक सलोखा आणि उत्साहात साजरी झाली ‘ईद-ए-मिलादुन्नबी’
सर्वधर्मीयांनी दिला ऐक्याचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांच्या जन्मोत्सव निमित्त सेलू शहरात ‘ईद-ए-मिलादुन्नबी’चा पवित्र सण अत्यंत धार्मिक उत्साह, आदरांजली आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. इस्लाम धर्मगुरूंच्या शिकवणीनुसार मानवता, शांतता आणि प्रेमाचा संदेश देत मुस्लिम बांधवांनी शहरातून भव्य मिरवणूक काढली.
कुरआन पठण व दुआ (प्रार्थना) या पवित्र दिनाची सुरुवात शहरातील मशिदींमध्ये विशेष धार्मिक विधी, कुरआन शरीफचे पठन आणि देश व दुनियेत शांतता, समृद्धी व ऐक्य नांदावे यासाठी विशेष ‘दुआ’ (प्रार्थना) मागून झाली.
सेलू येथील जोशीनगर मशिदीपासून निघणाऱ्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पैगंबरांच्या प्रेमात तल्लीन होत तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
मिरवणूक मार्गावर हिंदू व बौद्ध बांधवांनी पुढाकार घेऊन गळाभेट देऊन मुस्लिम बांधवांचे स्वागत केले. हा प्रसंग सेलू शहराच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम प्रतीक ठरला.
विकास चौक येथे ‘इदी फाउंडेशन’ व गरीब नवाज तंजीम कमिटी, गरीब नवाज मज्जीद कमिटी चे कार्यकर्ते आणि ‘नवचैतन्य बुद्ध विहार समिती’चे कार्यकर्ते नवीनकुमार पाटील,सोपान टेम्भूरणे, भानुदास मेश्राम, निखिल नंदेश्वर, विशाल नगराळे,बंधू जामनकर,यशवंत तेलंग, मधुकर तेलंग तसेच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ लोणकर, साहसीक संपादक रवींद्र कोटंबकर, नगरपंचायत बांधकाम सभापती किशोर इरपाते यांनी मिरवणुकीत सहभागी बांधवांचे स्वागत करून अल्पोपहार व मिठाई वाटप करण्यात आली. यादरम्यान सर्वधर्मसमभावाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
जोशीनगर व घोराड गावातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत मुस्लिम बांधवानी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या मिरवणुकीचा समारोप बाजार चौकातील मशिदमध्ये करण्यात आला आणि देश व समाजासाठी शांततेची प्रार्थना करण्यात आली.
या धार्मिक व ऐतिहासिक सोहळ्यात माजी नगरसेवक हिम्मत अली शाह, इमरान पठाण , कदीर पठाण, हमीद पठाण, कलीम शेख, शारुख शाह, सरफराज शाह, अहमद शाह ,राज शेख,इकबाल शेख ,साहिल पठाण, रिजवान शेख, हनिफ सय्यद,बबलू सय्यद जावेद सय्यद,मोबीन शेख, आदिल शेख, आसिफ शेख, राज शेख, वसीम, ईशान,तोहीद, आरिफ पठाण ,यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
हा उत्सव अत्यंत शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे आणि त्यांचे सहकारी उपनिरीक्षक उगले, राकेश देवगडे, जावेद धामीया, सुनील चावरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त राखला होता, ज्याबद्दल प्रशासनाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले.



