मत्स्य सहकारी संस्थेची ७ सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मच्छिद्र मत्स्य सहकारी संस्था मर्यादित, भद्रावतीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री बालाजी सभागृह, भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष दिलीप किसनराव मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
सभेत दि. ७ सप्टेंबरच्या सभेसाठी अध्यक्षांची निवड, सन २०२४-२५ चा आढावा, सन २०२५-२६ चा जमा-खर्च, नफा-तोटा, व्यापार पत्रक व ताळेबंदाचे वाचन, तसेच लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून लेखापरीक्षणातील दोष दुरुस्तीला मंजुरी देण्याबाबत चर्चा होणार आहे.
तसेच, १०० रुपयांचे हिस्से पूर्ण न केलेल्या सभासदांच्या हिस्सा रकमेसह भागभांडवल संस्थेच्या बचत निधीत समाविष्ट करण्याबाबत आणि संबंधित सभासदत्व कायमचे बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. संस्थेतील रिक्त असलेल्या सचिव पदाच्या नियुक्तीस मंजुरी, मत्स्यबीज कमिशन व दंडाची थकबाकी तसेच चोरटी मासेमारी करणाऱ्या सभासदांकडील दंड वसूल न झाल्यास त्यांचे सभासदत्व कायमचे बंद करण्याच्या विषयावरही चर्चा होणार आहे.
सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षकांची निवड करणे आणि सभाध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
कोरमअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या सभासदाचा मासेमारी परवाना एक वर्षापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सभेत कोणत्याही विषयावर विचारणा करावयाची असल्यास सभेच्या सात दिवस आधी संस्थेकडे लेखी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
मयत सभासदांच्या वारसांची नोंद संस्थेच्या अभिलेखावर करण्याबाबतही सूचना देण्यात आली असून, नोंद न केल्यास संबंधित सभासदत्व रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच सभेदरम्यान नशापाणी करून गोंधळ घालणाऱ्या सभासदांवर संस्थेच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष शंकर बंडुजी कामतवार, संचालक सुधाकर पैकाजी मांढरे यांच्यासह संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



