महाराष्ट्र_तेलंगणा राज्यमार्गाची दुरावस्था
मार्ग बंद होण्याची भीती ; तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्र – तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या आर्वी–धानोरा–चिंचोली– अमृतगुडा–शिरपूर मार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामूळे येथून प्रवास करतांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.जड वाहन खड्ड्यात अथवा चिखलात अडकल्यास मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याचे रोटी_बेटीचे व्यवहार आहेत. असे असतांना गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी – धानोरा – चिंचोली – अमृत गुडा – शिरपूर हा मार्ग महाराष्ट्र – तेलंगणा या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. सध्या या मार्गांवर मोठमोठे अनेक खड्डे पडल्याने या जीवघेणा मार्ग चर्चेत आहे.
*अवैद्य धंद्यासाठी ठरला “चोर मार्ग..!”*
*_अवजड आणि ओव्हरलोड वाहनांसाठी हा ‘चोर मार्ग’ ठरला आहे. अवैध धंद्यासाठी हा मार्ग अनुकूल असा आहे. देवाडा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नाक्यावर होणारी तपासणी टाळण्यासाठी ओव्हरलोड वाहने या मार्गाचा वापर करीत असल्याची चर्चा स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे आधीच खराब असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.*
या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी व अवजड वाहनांच्या चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पावसाळ्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. अश्यातच खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना अंदाज घेणे कठीण झाले आहे. यातून अपघाताची शक्यता वाढली आहे.
या गंभीर समस्येकडे पोलीस विभाग, बांधकाम विभागाने लक्षदेण्याची गरज आहे. यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



