दोषसिद्धी प्रकरणातील पीडित व तक्रारदारांच्या सुरक्षेसाठी वर्धा पोलिसांची विशेष खबरदारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पीडित, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्धा पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात २२ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली.
सन २०२६ मध्ये आरोपींना शिक्षा लागलेल्या २३ प्रकरणांतील २५ ते ३० पीडित, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांशी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. आरोपी किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास, धमकी, दबाव अथवा प्रलोभन दिले जात आहे का, याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच पीडितांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या.
तपासकामी पीडित, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस विभागाने त्यांचे कौतुक केले. भविष्यात कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव अथवा त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा तक्रारींची गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोषसिद्धी झालेल्या सर्व प्रकरणांचा तपास पुन्हा आढावा घेण्यात आला. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे तसेच इतर तांत्रिक व कायदेशीर बाबींचा सखोल तपास करून आरोपींविरुद्ध सक्षम पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्याआधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
पीडित व फिर्यादी यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांची असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देणे आणि पीडित व साक्षीदारांचा विश्वास कायम ठेवणे याला वर्धा पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पीडित, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.



