ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आश्रमशाळांनी हिरावले विद्यार्थ्यांच्या “शांत झोपेचे स्वातंत्र्य..!”

गोंडपिपरी तालुक्यातील नऊ आश्रमशाळांतील विदारक वास्तव ; तब्बल १,६५५ विद्यार्थी जमिनीवर झोपण्यास मजबूर;

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

स्वच्छतेचा अभाव अन् कुमारवयीन विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ; शाळा तपासणी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.?

गोंडपिपरी :- आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित, निरोगी आणि सन्मानजनक जीवनमान मिळावे, या उद्देशाने आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र गोंडपिपरी तालुक्यातील नऊ आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या शाळांमधील तब्बल १,६५५ विद्यार्थी झोपण्यासाठी पलंगाऐवजी थेट जमिनीचा आधार घेत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर आलेल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला ‘शांत झोपेचे स्वातंत्र्य’ही राहिले नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झोपण्याची सुरक्षित आणि स्वच्छ व्यवस्था ही चैनीची नव्हे, तर मूलभूत गरज आहे. मात्र या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जमिनीवरच झोपावे लागत असल्याने रात्रीची विश्रांती, आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यावर परिणाम होत आहेत. दिवसभर शाळा, अभ्यास आणि विविध उपक्रमांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर रात्री शरीराला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असताना, विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेची ही अवस्था संतापजनक असल्याची भावना पालकांकडून व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध होतो, मात्र विद्यार्थ्यांना रात्री झोपण्यासाठी जमिनीचा आधार घ्यावा लागत असेल, तर ही केवळ आश्रमशाळांची नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेची परीक्षा आहे. “शिक्षणाचा अधिकार” देताना विद्यार्थ्यांना “सन्मानाने आणि जगण्याचा अधिकार”ही मिळणार कधी, हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

आरोग्य_स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर

जमिनीवर झोपण्याच्या व्यवस्थेसोबतच पुरेशा स्वच्छतेचा अभाव हा आणखी चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी नियमित स्वच्छता, स्वच्छ बिछाने, पुरेशी जागा आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध नसल्याने अस्वच्छ वातावरणात दीर्घकाळ वास्तव्य करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेषतः कुमारवयीन विद्यार्थिनीच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न अधिक संवेदनशील आहे. वाढत्या वयातील मुलींना स्वच्छता, व्ययक्तिक जागा आणि आरोग्यविषयक सुविधा मिळत नसल्याने त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अनुदान आहे…सुविधा नाही.?

आश्रमशाळांच्या देखभाल_दुरुस्तीपासून तर विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून लाखोंचा निधी दिल्या जातो. मग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पलंग, गाद्या आणि स्वच्छ निवास व्यवस्था उपलब्ध का करून दिली जात नाही?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ कागदोपत्री सुविधा दाखवून आश्रमशाळांचा कारभार सुरळीत असल्याचे चित्र निर्माण केले जात असून, हा फक्त शाळा संचालकांचा “व्यवसाय” झाल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही फटका..?

पुरेशी झोप आणि विश्रांती ही विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेसाठी महत्वाची आहे. रात्री आरामदायी व सुरक्षित झोप मिळत नसल्याने त्याच्या परिणाम विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर, अभ्यासावर आणि शैक्षणिक प्रगतीवर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती आणि नवोदय सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही.

अधिकाऱ्यांची पाहणी केवळ कागदावरच..?

गोंडपिपरी तालुक्यातील नऊ आश्रमशाळांमध्ये १६५५ विद्यार्थी जमिनीवर झोपत असल्याची वास्तववादी परिस्थिती असून, संबंधित विभागाच्या नियमित तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अधिकाऱ्यांकडून आश्रमशाळांची पाहणी केली जाते, अहवाल तयार होतात; मग विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर असलेली ही समस्या आजपर्यंत प्रशासनाच्या निदर्शनास का आली नाही?, असा प्रश्न संतप्त पालकांकडून केला जात आहे.

तालुक्यातील आश्रमशाळानिहाय विद्यार्थी

*आकाश प्राथमिक आश्रमशाळा, गोंडपिपरी _ १७० विद्यार्थी.
*सुभद्राबाई सांगडा आश्रमशाळा, गोंडपिपरी _ ८० विद्यार्थी.
*अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, कुडेसावली_५४ विद्यार्थी.
*अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, कुडेसावली_७० विद्यार्थी.
*भारतीय आश्रमशाळा, तोहोगाव_५८० विद्यार्थी.
*श्रीराम प्राथमिक आश्रमशाळा, गोजोली_१३२ विद्यार्थी.
*श्रीराम माध्यमिक आश्रमशाळा, गोजोली _१०८ विद्यार्थी.
*स्वामी विवेकानंद प्राथमिक आश्रमशाळा, किरमिरी_१४२ विद्यार्थी.
*स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रमशाळा, किरमिरी_१०३ विद्यार्थी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये