निष्पाप मुलाची हत्या, पतीला फाशीची शिक्षा द्या; पत्नीची मागणी
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : दुर्गापूर परिसरातील शक्तीनगर वसाहतीमध्ये मंगेश बदखल या नराधम बापाने स्वत:च्याच दोन निष्पाप मुलांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेबाबत प्रेस क्लब येथे माध्यमांशी बोलताना पीडित पत्नीने टाहो फोडला. तो माणूस नसून एक विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे, असा थेट आरोप पिडित पत्नीने केला. तो दारूच्या पूर्णपणे आहारी गेला असून जुगारामुळे कर्जबाजारी झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने नातेवाईकांतील एका महिलेवर अत्याचार केला होता, ज्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. अशा नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. या नराधम पतीला फाशीची शिक्षा द्या, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्या, असा आक्रोश केला.
आपल्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराची आणि पतीच्या क्रूरतेची कहाणी सांगताना पीडित पत्नीला अश्रू आवरत नव्हते. लग्नाच्या अवघ्या एका वर्षानंतर पतीने खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती. तो किरकोळ कारणांवरून बेदम मारहाण करायचा.
पती सुधारेल या आशेने पत्नीने स्वत:चे व आपल्या आईचे दागिने गहाण ठेवून त्याला मदत केली, मात्र त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. शेवटी शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. आपली दोन्ही मुले स्वत:कडे सुरक्षित राहावीत म्हणून पीडित महिलेने एप्रिल २०२६ मध्ये पोलिसांत धाव घेतली होती, मात्र पोलिसांनी तिला न्यायालयाचा मार्ग दाखवला. त्यानुसार न्यायालयात मुलांच्या ताब्याबाबत केस सुरू होती आणि येत्या एक-दोन महिन्यांत अंतिम निकाल लागण्याची शक्यता होती.
परंतु, कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच या क्रूर बापाने दोन्ही मुलांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला जगण्याचा अधिकार नाही, सुटल्यानंतर त्याच्यापासून जीवीतास धोका आहे. त्याला फाशीच द्या, असा आक्रोश पिडित पत्नीने यावेळी केला.



