राजुरात काँग्रेसची ‘मंडल यात्रा सभा’ उत्साहात संपन्न ; ओबीसी हक्कांसाठी जनजागृतीचा निर्धार
सामाजिक न्याय, आरक्षण व घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी व्यापक अभियान.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा :- वंचित, शोषित व पीडित ओबीसी समाजाला सामाजिक न्याय, घटनात्मक हक्क आणि आरक्षणाचे संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे काढण्यात आलेल्या ‘मंडल यात्रा’ची सभा राजुरा येथील स्वयंवर मंगल कार्यालय, गडचांदूर रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, विदर्भ समन्वयक मोरेश्वर भादे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, ओबीसी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष धनराज मुंगले, विनोद अहिरकर, जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे, गुरूदास चौधरी, अजय हट्टेवार, प्रशांत पवार, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, ॲड. अरूणभाऊ धोटे, अँड. सदानंद लांडे, नंदकिशोर वाढई, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजुराचे रंजन लांडे, कोरपनाचे उत्तम पेचे, गोंडपिंपरीचे अशोक रेचनकर, राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष सुरेश पावडे, कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल मालेकर, गोंडपिंपरी तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष महेंद्र कुनघाडकर तसेच जिवती तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष तिरुपती पोले, गडचांदूर न प चे उपाध्यक्ष संजय मेंढी, राजुरा काँग्रेसचे शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, नानाजी आदे, न प सभापती अनंतकुमार ताजने, पूनम गिरसावळे, नगरसेवक इंदूबाई निकोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ‘हर एक ओबीसी बनेगा काँग्रेस’ या संकल्पनेतून आयोजित या सभेत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी व्यापक जनजागृती आणि संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार, राजकीय प्रतिनिधित्व तसेच सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर या मंडल यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ओबीसी समाजाच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये, यासाठी संघटितपणे आवाज उठविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. सभेला ओबीसी समाजबांधव, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले.
‘मंडल यात्रा ही केवळ राजकीय सभा नसून ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी जनजागृतीचे प्रभावी अभियान आहे असा सूर सभेत उमटला. सामाजिक न्याय, आरक्षण आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी ओबीसी समाजाने एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. राजुरानंतर ११ ऑगस्ट रोजी भद्रावती, वरोरा, हिंगणघाट व वर्धा येथे मंडल यात्रेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून सुरू झालेला ओबीसी हक्कांचा हा जनजागृतीचा एल्गार पुढे अधिक व्यापक करण्याचा निर्धार काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आला.



