ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्नी व तिच्या कथित प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या? अढेरा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा 

अढेरा येथे विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह दोघांवर गुन्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : वैवाहिक वाद आणि कथित मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अढेरा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या आईच्या फिर्यादीवरून अढेरा पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित मित्राविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला रामभाऊ तेजणकर (वय ६०, रा. अढेरा) यांनी अढेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वंदना सुरज तेजणकर (रा. मोहाडी, ता. सिंदखेड राजा) आणि सतीश रामेश्वर काकडे (रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४१/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मृत सुरज तेजणकर याचा विवाह २०२२ मध्ये वंदना हिच्याशी झाला होता. त्यांना पौर्णिमा नावाची मुलगी असून ती नऊ महिन्यांची असताना वंदना माहेरी निघून गेली आणि तेव्हापासून ती तेथेच राहत होती. दरम्यान, वंदना हिचे सतीश काकडे याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती सुरजला मिळाल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरज चिखली येथील हेडगेवार बीएमएस महाविद्यालयात कामाला लागला होता. फिर्यादीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान कामावरून घरी परतत असताना महिंद्रा कोटक बँकेसमोर त्याला त्याची पत्नी वंदना दुसऱ्या व्यक्तीसोबत दुचाकीवर जाताना दिसली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने त्याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीचा आरोप आहे की, सुरज पत्नीकडे सातत्याने घटस्फोट (फारकती) मागत होता; मात्र ती त्यासाठी तयार नव्हती. तसेच पत्नी आणि सतीश काकडे हे दोघेही त्याला जाणूनबुजून मानसिक त्रास देत असल्याने तो प्रचंड तणावाखाली होता.

या मानसिक तणावातूनच २३ जुलै रोजी पहाटे सुमारे ५ वाजता सुरजने आपल्या चुलत्याच्या शेतातील बेलाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पत्नी वंदना आणि सतीश काकडे हेच आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि अढेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश देढे यांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये